Chief Minister Fadnavis बल्लारशाह – गोंदिया रेल्वे दुहेरीकरणामुळे विदर्भाला फायदा
◾सर्वात जास्त फायदा विदर्भाला होईल - मुख्यमंत्री फडणवीस
चंद्रपूर,( राज्य रिपोर्टर न्युज ) : महाराष्ट्राच्या टोकावर असलेल्या बल्लारशाहची सीमा तेलंगणासोबत तर गोंदिया जिल्हा हा मध्य प्रदेश आणि छत्तीसगडला लागून आहे. त्यामुळे बल्लारशाह – गोंदिया रेल्वेच्या दुहेरीकरणामुळे सर्वात जास्त फायदा विदर्भाला होईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दूरदृष्यप्रणालीद्वारे आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले.Chief Minister Fadnavis
मुंबई येथून या पत्रकार परिषदेला मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव, मुख्य सचिव सुजाता सौनिक तर चंद्रपूर येथे आमदार किशोर जोरगेवार, आमदार सुधीर मुनगंटीवार, जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी व पत्रकार उपस्थित होते.
यावेळी मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, बल्लारशाह – गोंदिया रेल्वे लाईन करिता 4819 कोटी रुपये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी उपलब्ध करून दिले, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. विदर्भाच्या विकासासाठी ही एक महत्त्वाची रेल्वे लाईन आहे. राज्यात रेल्वेचे 1 लक्ष 73 हजार कोटींचे प्रकल्प सुरू असून महाराष्ट्रातील 132 रेल्वे स्टेशनचे अत्याधुनिकीकरण केंद्र सरकारने हाती घेतले आहे. राज्यात छत्रपती शिवाजी महाराज सर्किट सुरू होणार असून मॉडेल रेल्वेच्या माध्यमातून किल्ले व इतर ऐतिहासिक बाबींचे पर्यटन होण्यासाठी 10 दिवसांच्या रेल्वेचे नियोजन आहे, ही आपल्या राज्यासाठी अतिशय आनंदाची बाब आहे. रेल्वे विभागाचे महाराष्ट्राला नेहमीच प्राधान्य राहिले आहे.
पुढे ते म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून जगातील सर्वात मोठी क्रिएटिव्ह इकॉनोमिक समीट 1 ते 4 मे या कालावधीत मुंबईत होणार आहे. त्यासाठी 100 देशातील प्रतिनिधी उपस्थित राहतील. जगातील सर्वात मोठा इव्हेंट यशस्वी करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार प्रयत्न करीत आहे. रेल्वे मंत्रालयाने मुंबईत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजीच्या निर्मितीला हिरवी झेंडी दिली आहे, असेही मुख्यमंत्री यांनी सांगितले.
यावेळी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बल्लारशाह - गोंदिया रेल्वे लाईनच्या दुहेरीकरणासाठी 4819 कोटी रुपये मंजूर केले आहे. त्यामुळे उत्तर आणि दक्षिण भाग या रेल्वेच्या माध्यमातून जोडला जाईल. त्याचा फायदा विदर्भ आणि मराठवाड्याला होणार असून या रेल्वे मार्गामुळे आकांक्षीत तालुकेसुद्धा जोडले जातील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रात अनेक रेल्वे प्रकल्प सुरू केले आहेत. यात जालना -जळगाव रेल्वे प्रकल्प 7160 कोटी, मनमाड- इंदोर प्रकल्प 18000 कोटी, मनमाड -जळगाव प्रकल्प 2700 कोटी, भुसावळ -खंडवा रेल्वे प्रकल्प 3500 कोटी असे एकूण 1 लक्ष 73 हजार कोटींची गुंतवणूक रेल्वेच्या माध्यमातून महाराष्ट्रात करण्यात आली आहे, असे रेल्वेमंत्र्यांनी सांगितले.
असा राहील रेल्वेमार्ग : बल्लारशाह – गोंदिया रेल्वे दुहेरीकरणामुळे चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यातील एकूण 29 स्टेशन जोडले जातील. हा रेल्वेमार्ग एकूण 240 किमी लांबीचा असून यावर 36 मोठे पुल, 338 छोटे पूल तर 67 पुल रेल्वे लाईनच्या खाली असणार आहे.
0 Comments