बंगाली नववर्ष म्हणजे – संस्कृती, ऐक्य आणि आनंदाचा संगम – आ. किशोर जोरगेवार
◾चांदा पावर ऑफ युथ फाउंडेशन, चंद्रपूरच्या वतीने 'पोइला बैसाख' या बंगाली नववर्षानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
चंद्रपूर ( राज्य रिपोर्टर न्युज ) : बंगाली नववर्षाचा हा सण केवळ एक पारंपरिक उत्सव नाही, तर तो नवउद्यम, नवे स्वप्न आणि नवी आशा घेऊन येतो. आजच्या या सांस्कृतिक समारंभाने आपल्या चंद्रपूरात बहुजनता आणि विविधतेतील एकात्मतेचा सुंदर संदेश दिला आहे. बंगाली नववर्ष साजरा करणारा हा उत्सव केवळ तारखांचा बदल नाही, तर संस्कृती, ऐक्य आणि आनंदाचा अप्रतिम संगम असल्याचे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.
चांदा पावर ऑफ युथ फाउंडेशन, चंद्रपूरच्या वतीने बंगाली कॅम्प येथे बंगाली नववर्ष 'पोइला बैसाख' सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आमदार किशोर जोरगेवार बोलत होते. या प्रसंगी मंचावर मनोज पाल, भारतीय जनता पक्षाचे माजी शहराध्यक्ष दशरथसिंग ठाकूर, भाजप नेते प्रकाश देवतळे, माजी नगरसेवक सुभाष कासनगोट्टूवार, बलराम डोडाणी, श्री माता महाकाली महोत्सव समितीचे सचिव अजय जयसवाल आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना आ. जोरगेवार पुढे म्हणाले की, चंद्रपूरात वास्तव्यास असलेला बंगाली समाज प्रामाणिक आणि कष्टकरी आहे. चंद्रपूरच्या विकासात या समाजाचे नेहमीच भरीव योगदान राहिले आहे. या समाजातून अनेक सामाजिक कार्यकर्ते पुढे आले आहेत. हा समाज नेहमी आमच्या पाठीशी उभा राहिला असून, या समाजातील प्रश्न सोडविण्यास आपण कटिबद्ध असल्याचेही त्यांनी सांगितले. बंगाली कॅम्प, कृष्णा नगर या भागात आपण विकासकामे करत आहोत. पुढेही या भागाच्या विकासासाठी मोठा निधी देणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
संस्कृती ही आपली ओळख, आपला जन्मसिद्ध वारसा आहे. आज इथे नृत्य, गायन आणि फॅन्सी ड्रेस स्पर्धांमुळे आपण आपल्या सांस्कृतिक परंपरेला नवीन रूप दिले आहे. प्रत्येक कलाकाराने आपल्या कलादानातून भारतवासीयांच्या विविधतेचा अद्भुत मेळ घातला. सर्व समाजबंधूंनी एकत्र येऊन सण-उत्सव साजरे करणे हेच खरे बंधुत्वाचे प्रतीक आहे. चांदा पावर ऑफ युथ फाउंडेशनची ही जबाबदारी आणि दूरदृष्टी कौतुकास्पद आहे.
स्थानिक कलाकारांनी दिलेली उत्स्फूर्त कला सादरीकरणे तरुणाईला नव्या आत्मविश्वासाची प्रेरणा देतात. या सांस्कृतिक कार्यक्रमांमधून तुमच्यातील प्रतिभेचा उजेड अधिक तेजस्वी बनवायला शिका. तुमचे कलारूपी बीज आज येथे रुजत आहे. आजचा हा दिवस केवळ साजरा करण्यासाठी नसून, आपल्याला एकत्र येऊन सामाजिक सौहार्द दृढ करण्याची आणि सांस्कृतिक वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्याची प्रेरणा देणारा आहे, असेही यावेळी आमदार किशोर जोरगेवार म्हणाले. या कार्यक्रमाला समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे वितरित करण्यात आली.
0 Comments