विद्यार्थ्यांनी तांत्रिक ज्ञान अर्जित करावे यासाठी प्रयत्न - आमदार अभिजित वंजारी
◾आमदार अभिजित वंजारी यांचे प्रतिपादन : ग्रंथालयांना पुस्तके आणि शाळांना संगणकांचे वाटप
चंद्रपूर,( राज्य रिपोर्टर न्युज ) : मी पदवीधर मतदारसंघाचा आमदार आहे. माझा मतदारसंघ, माझे सदस्यत्व शिक्षणाशी संबंधित असल्याचे दर्शवितो. त्यामुळे मिळणारा आमदार निधी हा शैक्षणिक उद्देशासाठीच खर्च व्हावा, असा संकल्प विजयी झाल्यानंतर केला होता. ह्या संकल्पपूर्तीसाठी दरवर्षी माझ्या मतदारसंघातील सहाही जिल्ह्यात माझा आमदार निधीच्या माध्यमातून ग्रंथालयांना सध्याच्या काळात आवश्यक असलेली पुस्तके आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या तांत्रिक आणि संगणकीय ज्ञानात भर पडावी या उद्देशाने संगणक वाटप करीत आहे. मागील पाच वर्षांपासून हा उपक्रम सुरू आहे. माझा निधी ज्ञानवृद्धीसाठी खर्च होत आहे, याचे समाधान असल्याचे प्रतिपादन विधानपरिषदेतील मुख्य प्रतोद तथा आमदार अभिजित वंजारी यांनी केले.
चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील नियोजन भवनात गुरुवारी (ता. 17) आयोजित ‘कर्तव्यपूर्ती सोहळ्या’त ते बोलत होते. यावेळी मंचावर आमदार अभिजित वंजारी यांच्यासह शिक्षक आमदार सुधाकर अडबाले, चंद्रपूर जिल्हा (ग्रामीण) काँग्रेसचे अध्यक्ष माजी आमदार सुभाष धोटे, माजी आमदार डॉ. अविनाश वारजुकर, चंद्रपूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष रितेश तिवारी, चंद्रपूर शहर जिल्हा महिला काँग्रेस अध्यक्ष चंदाताई वैरागडे, ॲड. विजय मोगरे, शिक्षणाधिकारी राजेश पाटाडे, गोविंदराव वंजारी फाऊंडेशनचे सचिव डॉ. हेमंत सोनारे उपस्थित होते.
पुढे बोलताना ते म्हणाले, शहरी भागात शिक्षणाच्या उत्तम सोयी आहेत. मात्र ग्रामीण भागात आजही हव्या तशा सोयी नाहीत. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी पायपीट करावी लागते. आजचे जग तंत्रज्ञानाचे आणि स्पर्धेचे आहे. तंत्रशिक्षणाच्या किंवा संगणक शिक्षणाच्या मूलभूत सोयी ग्रामीण भागात उपलब्ध नाहीत. गावातील मुलांना तालुक्याच्या किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी जावे लागते. ही गरज ओळखून ग्रामीण भागातील शाळांना संगणकीय शिक्षणाच्या दृष्टीने बळकट करणे हा या उपक्रमामागील उद्देश आहे. शिवाय ग्रंथालयात गेल्या कित्येक वर्षांपासून तीच ती जुनी पुस्तके आहेत. आजच्या काळाची गरज ओळखून जागतिक घडामोडी, तंत्रज्ञान, आधुनिक साहित्य, युवांसाठी करियरच्या नव्या संधी आणि वाटा या विषयावरची अर्थात आधुनिकतेची गरज ओळखून आवश्यक असलेली पुस्तके जिल्ह्यातील ग्रंथालयांना उपलब्ध व्हावीत हा या उपक्रमामागील विचार असल्याचे त्यांनी सांगितले. संग़णक आणि पुस्तकांचा वापर विद्यार्थ्यांनी करावा, ही आता शिक्षक आणि ग्रंथालयांची जबाबदारी आहे, ती त्यांनी पार पाडावी, असे आवाहन त्यांनी केले. विद्यार्थ्यांना तांत्रिक ज्ञानासोबतच स्पर्धा परिक्षेची तयारी करण्याच्या दृष्टीने विनामूल्य कोचिंग देण्याचासुद्धा आपला प्रयत्न असल्याचे त्यांनी नमूद केले.
शिक्षक आमदार सुधाकर अडबाले यांनीही यावेळी भाषण केले. आमदार सजग राहिला तर निधीचा योग्य वापर कसा आणि कुठे होऊ शकतो, याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे हा कर्तव्यपूर्ती सोहळा आहे. लाभार्थी शाळांनी आणि ग्रंथालयांनी खऱ्या लाभार्थींना याचा लाभ द्यावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
यावेळी आमदार अभिजित वंजारी व अन्य मान्यवरांच्या हस्ते शाळांकडून उपस्थित प्रतिनिधींना संगणकांचे वाटप करण्यात आले. तर जिल्ह्यातील ग्रंथालयांना पुस्तकांचे वाटप करण्यात आले. संपूर्ण कार्यक्रमाचे संचालन आणि प्रास्ताविक गोविंदराव वंजारी फाऊंडेशनचे सचिव डॉ. हेमंत सोनारे यांनी केले. यावेळी शाळांतील शिक्षक, कर्मचारी, जिल्हा काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
0 Comments