चंद्रपूर जिल्ह्याला देशातील पर्यटनाच्या नकाशावर आणा – आ. किशोर जोरगेवार

 





चंद्रपूर जिल्ह्याला देशातील पर्यटनाच्या नकाशावर आणा – आ. किशोर जोरगेवार

◾पर्यटनविकासासाठी सर्व विभागांची एकत्रीत बैठक घेण्याची अधिवेशनात मागणी.

चंद्रपूर ( राज्य रिपोर्टर न्युज ) : पर्यटन हा सर्वाधिक रोजगार निर्माण करणारा घटक असून, चंद्रपूर जिल्ह्यात पर्यटनाच्या अपार संधी उपलब्ध आहेत. हा जिल्हा देशाच्या मध्यभागी स्थित असून, कोणत्याही नैसर्गिक आपत्तीचा धोका नाही. येथे वन, ऐतिहासिक, धार्मिक आणि औद्योगिक पर्यटनाचा मोठा वाव आहे. त्यामुळे संबंधित सर्व विभागांची एकत्रित बैठक घेऊन चंद्रपूर जिल्ह्याचा विकास पर्यटनदृष्ट्या करत चंद्रपूर जिल्ह्याला देशातील पर्यटनाच्या नकाशावर आणा अशी मागणी आमदार किशोर जोरगेवार यांनी अधिवेशनात केली.

मुंबई येथे सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आमदार किशोर जोरगेवार यांनी चंद्रपूर जिल्ह्याला पर्यटन हब बनविण्याची मागणी लावून धरली. त्यांनी अधिवेशनात बोलताना सांगितले की, चंद्रपूर जिल्ह्याला ऐतिहासिक वारसा लाभला आहे. येथे पाचशे वर्षे जुने महाकाली मंदिर आहे. या मंदिराच्या विकासासाठी २५० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असला तरी विकास आराखड्याला मंजुरी मिळालेली नाही. त्यामुळे हे काम त्वरित पूर्ण व्हावे.

ताडोबा अभयारण्यात दरवर्षी लाखो पर्यटक भेट देतात. मात्र, त्यांना जिल्ह्यातील इतर पर्यटनस्थळांकडे आकर्षित करण्यासाठी विशेष प्रयत्न आवश्यक आहेत. चंद्रपूर येथे टायगर सफारीसाठी २८७ कोटी रुपये मंजूर करण्यात आले असून, ४०० एकर जागेवर ही सफारी सुरू केली जाणार आहे. हे काम त्वरित सुरू करावे, अशी मागणीही त्यांनी केली. चंद्रपूर येथील पवित्र दीक्षाभूमीसाठी १०० कोटी रुपयांची मागणी करण्यात आली होती. त्यातील ५६ कोटी ९० लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. उर्वरित निधी तातडीने उपलब्ध करून देण्यात यावा, अशी मागणी त्यांनी सभागृहात केली. 

चंद्रपूर हा औद्योगिकदृष्ट्या महत्त्वाचा जिल्हा आहे. येथे वीज निर्मिती केंद्रे, सिमेंट उद्योग, कागद कारखाने आणि कोळसा खाणी आहेत. औद्योगिक पर्यटनाच्या दृष्टीने या सर्व सुविधांचा विकास करून, बंद पडलेल्या वेकोलीच्या भूमिगत खाणी पर्यटनासाठी खुल्या कराव्यात, अशी मागणीही आमदार किशोर जोरगेवार यांनी केली. पर्यटनविकासाला चालना देण्यासाठी ठोस उपाययोजना करण्यात याव्यात आणि चंद्रपूर जिल्ह्याला देशाच्या पर्यटन नकाशावर स्थान मिळवून द्यावे, अशी मागणी आमदार किशोर जोरगेवार यांनी अधिवेशनात जोरदारपणे मांडली आहे.




Post a Comment

0 Comments