भोगवटदार वर्ग २ ते १ प्रकरणी नजराना रक्कम ७५% ऐवजी २५% करण्याबाबत प्रारूप नियम प्रस्तावित
◾हंसराज अहीर यांच्या पुढाकाराने राज्यातील मागासवर्ग व अन्य प्रवर्गातील शेतकऱ्यांना होणार लाभ
चंद्रपूर / यवतमाळ ( राज्य रिपोर्टर न्युज ) : भोगवटा वर्ग २च्या जमिनीचे भोगवटा वर्ग १ मध्ये रूपांतरीत करण्यासाठीच्या प्रलंबित तसेच दाखल केलेल्या प्रकरणात उपविभागीय अधिकारी स्तरावरील प्रकरणांचा त्वरीत निपटारा करण्याचे तसेच शासनस्तरावरील निर्णय अपेक्षित असलेल्या प्रस्तावाचे अविलंब वर्गीकरण करून ही प्रकरणे शासन मान्यतेकरिता सादर करण्याच्या सुचना राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष तथा पूर्व केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी याविषयी वेळोवेळी घेतलेल्या सुनावणींचा आढावा घेवून केली आहे.
भोगवटा वर्ग १ प्रकरणी हंसराज अहीर यांनी गत वर्षभरापासून चंद्रपूर व यवतमाळ जिल्ह्यातील विविध उपविभागीय अधिकारी कार्यालयीन स्तरावर जनसुनावणी घेतली होती. त्यांनी या संबंधात मा. देवेंद्रजी फडणवीस यांचेस्तरावर पत्रव्यवहार व चर्चा करून ७५% आकारण्यात येणारी नजराणा रक्कम कमी करण्याकरिता सातत्याने प्रयत्न केले होते. याविषयी राज्यशासनाने दि. २० फेब्रुवारी २०२५ रोजी प्रारूप नियम प्रस्तावित करून, ७५% असलेली नजराना रक्कम नगरपंचायत, नगरपरिषद हद्दीतील व बाहेरील, कृषक प्रयोजनार्थ धारण जमिनीला २५% आणि अकृषक जमिनीला ५०%, रहिवासी प्रयोजनार्थ व कब्जी हक्काने वैयक्तिकरित्या धारण केलेल्या जमिनीसाठी १५% व भाडेपट्टयाने वैयक्तिकरित्या धारण केलेल्या जमिनीसाठी २५% नजराना रक्कम प्रस्तावित केल्यामुळे मोठ्या संख्येतील भोगवटदार २ च्या बहुतांशी मागासवर्ग प्रवर्गातील शेतकऱ्यांना वर्ग १ करण्याकरिता मोठा लाभ मिळाला आहे.
राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाच्या सुनावणी दरम्यान अन्य मागासवर्ग प्रवर्गातील शेतकऱ्यांनी वेळोवेळी मागणी केली होती की, वर्ग २ मधून वर्ग १ मध्ये जमिनीचे रूपांतर करतांना ७५% नजराना रक्कम भरणे अनिवार्य केल्याने आपली जमीन विकत घेण्यासारखा प्रकार असल्यामुळे नजराना रक्कम कमी करण्यात यावी अहीर यांनी याबाबत शासनस्तरावर निर्णय घेण्यासाठी तत्कालीन उपमुख्यमंत्री व विद्यमान मुख्यमंत्री यांच्याकडे पाठपुरावा करण्याबाबत आश्वस्त केले होते. शासनाने नजरान्याची रक्कम कमी केल्याने ही प्रलंबित प्रकरणे मार्गी लावण्यात अहीर यांना यश मिळाले आहे.
चंद्रपूर व यवतमाळ जिल्ह्यातील उपविभागीय अधिकारी स्तरावरील मागील काही वर्षापासून प्रलंबित प्रकरणांसह दाखल करण्यात आलेली अनेक प्रकरणे मार्गी लावण्यात आल्याने वर्ग १ मध्ये जमिनीचे रूपांतर होत असल्याने अनेक शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीचे मालकीहक्क मिळू लागल्याने शासनाच्या विविध सोयीसुविधांचा लाभही जिल्ह्यातील मागासवर्गीय तसेच अन्य प्रवर्गातील शेतकऱ्यांना मिळणार असल्याने हंसराज अहीर यांनी मुख्यमंत्री व महसुलमंत्र्यांचे विशेष आभार मानले आहे.
0 Comments