चंद्रपूर-मुंबई, चंद्रपूर-पुणे दररोज जलदगती रेल्वे सुरू करा – आ. किशोर जोरगेवार

 




चंद्रपूर-मुंबई, चंद्रपूर-पुणे दररोज जलदगती रेल्वे सुरू करा – आ. किशोर जोरगेवार

◾मध्य रेल्वेचे मुंबई महाव्यवस्थापक धर्मवीर मीणा यांची भेट घेत मागणी.


चंद्रपूर ( राज्य रिपोर्टर न्युज ) : चंद्रपूरहून मुंबई आणि पुण्याला जाणाऱ्यांची संख्या अधिक असतानाही आठवड्यातून एक सुपरफास्ट रेल्वे या मार्गाने धावत आहे. परिणामी, प्रवाश्यांची मोठी गैरसोय होत आहे. त्यामुळे चंद्रपूर-मुंबई, चंद्रपूर-पुणे दररोज जलदगती रेल्वे सुरू करण्याची मागणी आमदार किशोर जोरगेवार यांनी मध्य रेल्वेचे मुंबई महाव्यवस्थापक धर्मवीर मीणा यांना केली आहे.

मध्य रेल्वेचे मुंबई महाव्यवस्थापक धर्मवीर मीणा हे आज चंद्रपुरात असताना, रेल्वे स्थानक येथील मिटिंग हॉल येथे आमदार किशोर जोरगेवार यांनी त्यांची भेट घेऊन सदर मागणी केली आहे. यावेळी रेल्वे विभागाचे वरिष्ठ उपमहाव्यवस्थापक कुशकुमार मिश्रा, मुख्य वाणिज्य व्यवस्थापक  एस. एस. गुप्ता, मुख्य अभियांत्रिकी व्यवस्थापक रजनीश माथुर, मुख्य जनसंपर्क अधिकारी स्वप्निल, नागपूरचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक विनायक गर्ग, वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक अमन मित्तल, वरिष्ठ विभागीय ऑपरेशन्स व्यवस्थापक कृष्णा जी पाटील, वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त मनोजकुमार , चंद्रपूर स्थानक व्यवस्थापक आयाज खान, रेल्वे सुरक्षा दल प्रमुख कृष्णानंद राय, वरिष्ठ विभागीय नियंत्रण निरीक्षक केशव जैन चंद्रपूर रेल्वे प्रवासी सेवा संस्थेचे झोनल रेल्वे वापरकर्ता समन्वय समिती सदस्य दामोदर मंत्री, विभागीय रेल्वे वापरकर्ता समन्वय समिती सदस्य मिलिंद दाभेरे यांची उपस्थिती होती.

  चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील हजारो विद्यार्थी, व्यापारी, शासकीय अधिकारी आणि कर्मचारी यांना मुंबई आणि पुणे येथे नियमित प्रवास करावा लागतो. मात्र, सध्या उपलब्ध असलेल्या रेल्वे गाड्यांमुळे १६-१८ तासांचा कालावधी लागत आहे. तसेच प्रवाशांसाठी तिकिटांचीही कमतरता जाणवत आहे. परिणामी, अनेकांना नागपूरमार्गे प्रवास करावा लागतो, जो वेळखाऊ आणि खर्चिक ठरत आहे. सध्या चंद्रपूरहून मुंबई आणि पुण्यासाठी केवळ साप्ताहिक गाड्या उपलब्ध असल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

या पार्श्वभूमीवर, चंद्रपूर-मुंबई आणि चंद्रपूर-पुणे दररोज धावणारी दूरोंतो किंवा सुपरफास्ट एक्सप्रेस सुरू करावी, अशी मागणी आमदार किशोर जोरगेवार यांनी केली आहे. चंद्रपूर रेल्वे स्थानकावर आलेल्या मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक श्री. धर्मवीर मीणा यांच्याकडे आमदार जोरगेवार यांनी मागणी करत या जलदगती रेल्वे सेवेच्या माध्यमातून मागास आणि नक्षलग्रस्त भागाच्या विकासाला चालना मिळेल, तसेच प्रवाशांची गैरसोय दूर होईल, असे सांगितले आहे. तसेच दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या (SECR) चांदा पोर्ट रेल्वे स्टेशनला मध्य रेल्वेच्या चंद्रपूर स्टेशनशी जोडण्यासाठी आवश्यक असलेल्या कॉर्ड लाईनच्या कामाला तातडीने मंजुरी द्यावी आणि लवकरात लवकर हे काम पूर्ण करावे, अशी मागणी आमदार किशोर जोरगेवार यांनी केली आहे.

कोलकाता साठी विशेष ट्रेनची मागणी

चंद्रपुरात बंगाली समाज बांधव मोठ्या संख्येने वास्तव्यास असून, त्यांना कोलकाता जाण्यासाठी अडचणी येत असतात. अशा परिस्थितीत कोलकाता जाण्यासाठी ट्रेन सुरू करण्याची मागणीही आमदार किशोर जोरगेवार यांनी मध्य रेल्वेचे मुंबई महाव्यवस्थापक धर्मवीर मीणा यांना केली आहे.

श्री माता महाकाली दर्शन यात्रा स्पेशल ट्रेनची आमदार किशोर जोरगेवार यांची मागणी

चंद्रपूरच्या प्रसिद्ध श्री माता महाकाली मंदिरात चैत्र नवरात्र आणि महोत्सव काळात लाखो भाविक दर्शनासाठी येतात. या यात्रेकरूंच्या सोयीसाठी आमदार किशोर जोरगेवार यांनी "श्री माता महाकाली दर्शन यात्रा स्पेशल" ( 30 मार्च ते 13 एप्रिल 2025 ) आणि "श्री माता महाकाली महोत्सव स्पेशल" ( 27 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर 2025 ) या विशेष रेल्वे गाड्या जालना-चंद्रपूर मार्गावर चालवण्याची मागणी केली आहे.

या विशेष गाड्यांमध्ये 10 स्लीपर आणि 10-12 जनरल डब्यांची व्यवस्था ठेवावी तसेच तिकीट दर सर्वसामान्यांना परवडणारे असावेत, अशी मागणीही यावेळी त्यांनी केली आहे.




Post a Comment

0 Comments