झरपट नदीचे पुनरुज्जीवन ठरेल चंद्रपूरच्या समृद्धीसाठी महत्त्वाचे पाऊल - मुनगंटीवार
◾आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला विश्वास
◾पर्यावरण मंत्री पंकजा मुंडेंना पुनरुज्जीवन व सौंदर्यीकरणासाठी पत्र
◾तज्ज्ञ टिम नेमून प्रत्यक्ष पाहणी करण्याची आ. श्री. मुनगंटीवार यांची मागणी
चंद्रपूर,( राज्य रिपोर्टर न्युज ) : चंद्रपूर शहरातून वाहणाऱ्या झरपट नदीमध्ये वाढलेली जलपर्णी महाकाली यात्रेतील भाविकांसाठी अडचणीची ठरत आहे. त्यामुळे नदीचे सौंदर्यीकरण, खोलीकरण आणि स्वच्छता आवश्यक आहे. तसेच नदीचे पुनरुज्जीवन करणे अत्यावश्यक आहे. याकरिता राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी पुढाकार घेतला आहे. त्यांनी राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजाताई मुंडे यांना झरपट नदीचे पुनरुज्जीवन व सौंदर्यीकरणासाठी तज्ज्ञ टिम नेमून प्रत्यक्ष पाहणी करण्याची पत्राद्वारे मागणी केली आहे.
चंद्रपूर शहरातून वाहणारी झरपट नदी केवळ एक जलस्रोत नसून, शहराच्या ऐतिहासिक व सांस्कृतिक वारशाचा एक अविभाज्य भाग आहे. गोंडकालीन किल्ल्यांच्या सान्निध्यातून वाहणारी ही नदी चंद्रपूरच्या सौंदर्यात भर घालते. मात्र, गेल्या काही दशकांपासून तिची दुरवस्था झाली आहे. स्वच्छता, खोलीकरण आणि सौंदर्यीकरणाच्या दृष्टीने दुर्लक्ष झाले. मात्र आ. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी नदीच्या पुनरुज्जीवनाचा निर्धार केला आहे.
विशेषतः माता महाकाली मंदिराच्या भक्तांसाठी आणि यात्रेकरूंना ही नदी श्रद्धास्थान वाटते. त्यामुळे या नदीचे संवर्धन म्हणजे केवळ पाण्याचा प्रश्न सोडवणे नव्हे, तर शहराच्या सांस्कृतिक अस्मितेचे जतन करणेही आहे. स्थानिक प्रशासन आणि नागरिकांनी एकत्र येऊन नदीच्या स्वच्छतेसाठी मोहीम राबविण्याची आवश्यकता आहे. त्यादृष्टीने आ. श्री. मुनगंटीवार यांनी स्थानिक प्रशासनाला सुद्धा यासंदर्भात कळविले आहे.
झरपट नदीचे पुनरुज्जीवन केवळ पर्यावरणपूरक उपक्रम नसून, चंद्रपूरच्या भविष्यासाठी एक महत्त्वाचा निर्णय ठरेल, असा विश्वास आ. श्री. मुनगंटीवार यांनी व्यक्त केला आहे. प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन ठोस पावले उचलण्याची गरज आहे. सर्वांनी एकत्र येऊन झरपट नदीला पूर्वीचे वैभव मिळवून देणे हे कर्तव्य आहे, असेही श्री. मुनगंटीवार यांनी म्हटले आहे.
यासाठी भाजपा महानगराचे जिल्हाध्यक्ष राहुल पावडे व पदाधिकाऱ्यांनी आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे झरपट नदीचे सौंदर्यीकरण, संवर्धन आणि पुनरुज्जीवन करण्यासंदर्भात निवेदनातून मागणी केली होती. त्यावर आ. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी दखल घेत पाठपुरावा केला आहे, हे विशेष.
0 Comments