एचएमपीव्ही ( HMPV ) विषाणु सतर्कतेबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडून यंत्रणेचा आढावा

 





एचएमपीव्ही ( HMPV ) विषाणु सतर्कतेबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडून यंत्रणेचा आढावा

◾ अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन


चंद्रपूर ( राज्य रिपोर्टर न्युज ) : सध्या चीन मध्ये एचएमपीव्ही (HMPV) या विषाणूचा उद्रेक झाला असून याबाबत विविध प्रकारच्या खोट्या बातम्या, अफवा परसविण्यात येत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच घाबरून सुध्दा जाऊ नये, असे आवाहन प्रभारी जिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयात विविध यंत्रणेचा आढावा घेतांना ते बोलत होते. यावेळी सहायक जिल्हाधिकारी निवासी उपजिल्हाधिकारी दगडू कुंभार, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. महादेव चिंचोळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अशोक कटारे आदी उपस्थित होते.

 श्री. जॉन्सन म्हणाले, एचएमपीव्ही विषाणू बाबत शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे सर्वांनी पालन करावे. प्रत्येक विभागाने याबाबत जनजागृती करून नागरिकांना आश्वस्त करावे. जिल्हा शल्य चिकित्सक आणि जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी उपलब्ध वैद्यकीय संसाधने व इतर अनुषंगीक बाबींचा त्वरीत आढावा घ्यावा. तसेच नागरिकांनी कोणत्याही खोट्या माहितीवर विश्वास ठेवू आणि घाबरू नये, असे आवाहन त्यांनी केले.

चीनमध्ये आढळलेला मानवी मेटान्युमोव्हायरस अर्थात HMPV हा तीव्र श्वसन संसर्गाचे प्रमुख कारण आहे. हा विषाणू सर्वप्रथम नेदरलंड मध्ये 2001 मध्ये आढळून आला होता. हा एक सामान्य विषाणू असून श्वसन मार्गाच्या वरील भागातील संसर्गास कारणीभूत ठरतो. सर्दी सारखा सामान्य आजार यामुळे होतो. हा एक हंगामी रोग असून हिवाळा व उन्हाळ्याच्या सुरुवातीला उद्भवतो. महाराष्ट्रात आतापर्यंत HMPV चा एकही रुग्ण आढळून आलेला असून कोणीही घाबरण्याचे कारण नाही. तथापी  खबरदारीचा भाग म्हणून नागरिकांनी श्वसनाच्या संसर्गापासून बचाव करण्यासाठी मार्गदर्शक सुचानाचे पालन करण्याचे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.

सार्वजनिक आरोग्य विभागाने राज्यातील श्वसनाच्या संसर्गाच्या आकडेवारीचे विश्लेषण केले आहे. वर्ष 2023 च्या तुलनेत डिसेंबर 2024मध्ये कोणतीही वाढ झालेली नाही. तथापि खबरदारीचा एक भाग म्हणून नागरिकांनी  श्वसनाच्या संसर्गपासून बचाव करण्यासाठी काय करावे आणि काय करू नये या संदर्भातील सुचानाचे पालन करावे.

काय करावे : 1. खोकला किंवा शिंका येत असेल तेव्हा तोंड आणि नाक, रुमाल किंवा टिश्यू पेपरने झाकावे. 2. साबण आणि पाण्याने आपले हात वारंवार धुवा. 3. ताप, खोकला आणि शिंका येत असल्यास सार्वजनिक ठिकाणापासून दूर राहा. 4. भरपूर पाणी प्या आणि पौष्टिक अन्न खा. 5. संक्रमण कमी करण्यासाठी सर्व ठिकाणी पुरेसे वायुविजन (व्हेटीलेषण) होईल, याची दक्षता घ्या.

काय करू नये : 1. हस्तांदोलन, 2. टिश्यू पेपर आणि रुमालाचा पुनर्वापर, 3. आजारी लोकांशी जवळचा संपर्क, 4. डोळे,नाक आणि तोंडाला वारंवार स्पर्श करणे. 5. सार्वजनिक ठिकाणी थुंकणे. 6. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय (सेल्फ मेडिकेशन)घेणे.





Post a Comment

0 Comments