बल्लारपूरच्या भाजपा सदस्य नोंदणीची राज्यात चर्चा व्हावी - मुनगंटीवार
◾आ. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली अपेक्षा
◾भाजपा सदस्यता अभियानाचा शुभारंभ
बल्लारपूर ( राज्य रिपोर्टर न्यूज ) : चंद्रपूरची प्रत्येक गोष्ट देशात चर्चेचा विषय ठरत आली आहे. आपली सैनिकी शाळा असो, वनसंपदा असो अथवा येथील वाघांची संख्या असो. आपल्या भागातील सागवान काष्ठ तर अयोध्येच्या प्रभू श्रीराम मंदिराच्या बांधकामासाठी वापरण्यात आले. त्याचप्रमाणे आता भाजपच्या सदस्यता नोंदणी अभियानातही बल्लारपूरची चर्चा महाराष्ट्रात होईल असा विश्वास राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आ. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला.
भाजपा सदस्यता अभियानाचा शुभारंभ आ. श्री. मुनगंटीवार यांच्या हस्ते झाला. यावेळी भाजपा जेष्ठ नेते चंदनसिंह चंदेल , भाजपा जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा, महामंत्री डॉ मंगेश गुलवाडे,शहराध्यक्ष काशीनाथ सिंह, मनीष पांडे, शिवचंद दिवेदी, निलेश खरबडे,समीर केने,राजू दारी, वैशाली जोशी आणि भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी चार नवमतदार मुलींची प्राथमिक सदस्य म्हणून नोंदणी करण्यात आली. नवंमतदारांचा सहभाग हा सशक्त लोकशाहीसाठी एक महत्त्वाचा टप्पा असल्याचे श्री. मुनगंटीवार म्हणाले.
‘राष्ट्र प्रथम, नंतर पक्ष आणि शेवटी स्वतः’ हा भाजपचा राष्ट्रोन्नतीचा विचार आहे. 'सशक्त भारत' बनवायचा असेल, तर त्यासाठी आधी 'सशक्त भाजपा' हे ध्येय सत्यात उतरवावे लागेल. बल्लारपूर येथे आज सदस्यता नोंदणी अभियानाचा शुभारंभ करताना, या अभियानाच्या माध्यमातून बल्लारपूर मतदारसंघातील सर्व समाजातील लोकांना भाजपाच्या विचारांशी जोडण्याचा संकल्प करावा,’ असे आवाहन यावेळी आ. श्री. मुनगंटीवार यांनी केले.
गरीब जनतेचा, शोषित-वंचितांचा आवाज बुलंद करायचा असेल तर पक्ष देखील तितकाच मजबूत असायला हवा. त्यासाठी समाजापर्यंत पक्षाचा विचार पोहोचविण्याचे कार्य आपल्याला करावे लागेल, असे आवाहन आ. श्री. मुनगंटीवार यांनी केले.
ते म्हणाले, ‘बल्लारपूरच्या प्रत्येक बुथवर दोनशेपेक्षा जास्त सदस्य आपल्याला बनवावे लागतील. आपण करू ते प्रत्येक काम अव्वल असायला हवे, ही भावना ठेवून मी आजवर पूर्ण शक्तीनिशी काम करत आलोय. आता सदस्य नोंदणी अभियानात बल्लारपूर विधानसभा अव्वल ठरविण्याचा निर्धार करुया. जिल्हाध्यक्ष, शहराध्यक्ष, सर्व पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी मिळून कार्य करायला हवे. हे कार्य कुणा एकाचे नसून प्रत्येकाचे आहे. त्यामुळे प्रत्येकाने त्यासाठी उत्साहाने पुढे आले पाहिजे.’
कुठल्याही परिस्थितीत आपली सदस्य नोंदणी थांबायला नको. सत्ता येण्यामागे सगळ्यात मोठी भूमिका लाडक्या बहिणींनीची होती. या निवडणुकीत मतदानासाठी महिला बाहेर पडल्याने अनेक नेते निवडून आले. आता आपण महिलांसाठी योजना आखुया. केवळ योजना तयार होऊन उपयोग नसतो. तर आपल्याला मतदारांपर्यंत योजना पोहोचविता आल्या पाहिजे. कार्य सुरु ठेवण्यासाठी संघटना शक्तिशाली असायला हवी, असंही आ. श्री. मुनगंटीवार म्हणाले.
कार्य विसरलेलो नाही - येत्या 16 जानेवारीला महामहिम राज्यपालांच्या उपस्थितीत चंद्रपूर येथे आंतरराष्ट्रीय पर्यावरण परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. त्यासाठी अमेरिका आणि विदेशातून काही विद्यार्थी सुद्धा उपस्थित राहणार आहेत. मी मंत्री असताना हे आश्वासन दिले होते. आता मंत्री नाही, पण मी माझे कार्य विसरलो नाही, असेही आ. मुनगंटीवार म्हणाले.
0 Comments