विदर्भातील बांबू हस्तकला वस्तूला मिळणार आंतरराष्ट्रीय बाजारपेठ

 












विदर्भातील बांबू हस्तकला वस्तूला मिळणार आंतरराष्ट्रीय बाजारपेठ

◾विदर्भातील बांबू उद्योजक व कारागीर समूहासाठी एकदिवसीय कार्यशाळा

◾विदर्भातील विविध जिल्ह्यातून बांबू उद्योजक व कारागीरांचा सहभाग

चंद्रपूर, ( राज्य रिपोर्टर न्युज ) : विदर्भातील बांबू हस्तकलेला जागतिक बाजारपेठ प्राप्त व्हावी, या उद्देशाने चीचपल्ली येथील बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्र, महानिर्देशक विदेश व्यापार कार्यालय नागपूर (डी. जी.एफ.टी.) व हस्तकला निर्यात प्रवर्तन परिषद (ई. पी.स.एच) या संस्था एकत्र येऊन विदर्भातील बांबू उद्योजक, बांबू कारागीर समूह यांच्यासाठी एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन वन अकादमी येथे करण्यात आले होते. 

विशेष म्हणजे, या कार्यशाळेसाठी विदर्भातील विविध जिल्ह्यातून 80 बांबू उद्योजक व कारागीर सहभागी झाले होते. 

कार्यशाळेच्या उदघाटन प्रसंगी नागपूर डी.जी. एफ. टी. च्या सहाय्यक निदेशक स्नेहल ढोके, वन प्रबोधनीच्या अपर संचालक मनिषा भिंगे, मुख्य डाक कार्यालयाचे विकास अधिकारी सुधीर आकोटकर, बॅंक ऑफ महाराष्ट्रचे शाखा प्रबंधक सागर खापणे, महिला आर्थिक विकास मंहामंडळाचे जिल्हा समन्वय अधिकारी श्री. काठोळे, श्री. पंधरे, बी.आर.टी.सी.चे वनपरिक्षेत्र अधिकारी ए.डी.मल्लेलवार आदी हजर होते. 

प्रास्ताविकेत बोलतांना सहायक निदेशक स्नेहल ढोके म्हणाल्या, जगातील हस्तकला वस्तूच्या व्यापारात भारताचा 40 टक्के वाटा असून आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत बांबू हस्तकला वस्तूची बरीच मागणी आहे. विदर्भातील या बांबू वस्तूची निर्यात वाढविण्यासाठी डी.जी.एफ. टी. कार्यालयातर्फे विशेष प्रयत्न केले जात असून कार्यालयामार्फत राबविल्या जाणाऱ्या विविध योजनांची माहिती दिली. 

आंतरराष्ट्रीय व्यापारात विदर्भातील बांबू वस्तूची विक्री ही मोठ्या प्रमाणात व्हावी यासाठी शासनातर्फे उपलब्ध करून दिल्या जाणाऱ्या योजनांचा  फायदा बांबू उद्योजक व कारागीर यांनी घेतला पाहिजे असे आवाहन, वन प्रबोधिनीच्या अप्पर संचालक मनिषा भिंगे यांनी केले. 

तज्ञ मार्गदर्शक तथा ई.पी.सी.एच.चे सहायक निदेशक क्रिष्णा चंदर यांनी हस्तकला निर्यात प्रवर्तन परिषद विभागातर्फे राबविल्या जाणाऱ्या विविध योजनांची माहिती दिली. 

मुख्य डाक कार्यालयाचे विकास अधिकारी श्री. आकोटकर यांनी देशभरात डाक विभागाचे जाळे मोठ्या प्रमाणात पसरले असून हस्तशिल्प व्यापारासाठी डाक विभागाने अनेक योजना तयार केल्या आहेत. त्याचा फायदा बांबू उद्योजक व कारागीरांनी घ्यावा. तसेच या कार्यशाळेत उपस्थितांसमक्ष बी.आर.टी.सी. सोबत सामंजस्य करार केला. 

माविमचे जिल्हा समन्वय अधिकारी प्रदीप काठोळे यांनी बी.आर. टी.सी. व माविम या विभागांनी एकत्र येऊन सामुहिक उपयोगिता केंद्राच्या माध्यमातून महिला बांबू कारागिराच्या रोजगार निर्मितीसाठी केल्या जाणाऱ्या उपक्रमाची माहिती दिली. बँक ऑफ महाराष्ट्रचे शाखा प्रबंधक सागर खापणे यांनी बांबू उद्योजक व कारागीरांचे उद्योग वाढीसाठी बँक बँकेमार्फत केल्या जाणाऱ्या अर्थसहाय्य योजनांची संक्षिप्त माहिती  दिली. तर अमेझॉन ग्लोबलचे यश दवे यांनी बांबू वस्तूच्या विक्रीसाठी आॅनलाईन प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देण्याच्या प्रक्रीयेबाबत माहिती दिली. 

विदर्भातील बांबू उद्योजकाच्या बांबू हस्तकला वस्तूंना आंतरराष्ट्रीय व्यापारात स्थान मिळावे, याकरिता एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक (संशोधन,शिक्षण व प्रशिक्षण) तथा वन प्रबोधिनीचे संचालक श्री. एम. एस. रेड्डी, बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्राचे संचालक अशोक खडसे यांच्या  मार्गदर्शनात करण्यात आले. 

कार्यशाळेच्या यशस्वी आयोजनासाठी बांबू उद्योजक व कारागीरांनी बी.आर. टी.सी.चे आभार मानले. कार्यशाळेचे संचालन पर्यवेक्षिका योगिता साठवणे तर आभार वनपरिक्षेत्र अधिकारी ए.डी. मल्लेलवार यांनी मानले. 




Post a Comment

0 Comments