मनपा आयुक्तांना बोलावून शहर स्वच्छ ठेवत नागरिकांच्या समस्या प्राथमिकतेने सोडविण्याच्या सूचना.
◾मतदार संघात पोहोचताच आमदार किशोर जोरगेवार यांचा जनसंपर्क.
चंद्रपूर ( राज्य रिपोर्टर न्युज ) : भारतीय जनता पक्षाचे नवनिर्वाचित आमदार किशोर जोरगेवार चंद्रपूरात पोहोचताच त्यांनी कार्यालयात जनसंपर्क साधत नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. महानगरपालिका संदर्भात अधिक समस्या असल्याचे लक्षात येताच त्यांनी मनपा आयुक्त विपिन पालिवाल यांना कार्यालयात बोलावून घेतले. शहर स्वच्छ ठेवणे आणि नागरिकांच्या समस्या प्राथमिकतेने सोडविण्याच्या सूचना त्यांनी यावेळी आयुक्तांना दिल्या.
आपण मत रूपी आशीर्वाद देत सलग दुसऱ्यांदा मला आमदार म्हणून निवडून पाठवले आहे. चंद्रपूरात अनेक विकासकामे करायची आहेत. मागील पाच वर्षांत अपूर्ण राहिलेल्या महत्त्वाच्या कामांना गती द्यायची आहे. येत्या काही दिवसांत या कामांना गती मिळाल्याचे आपणास दिसेल. आपल्या मतांच्या आशीर्वादामुळे विकासाचा पाया अधिक मजबूत करू," अशी ग्वाही नवनिर्वाचित आमदार किशोर जोरगेवार यांनी यावेळी दिली.
निवडून आल्यानंतर आज भारतीय जनता पक्षाचे नवनिर्वाचित आमदार किशोर जोरगेवार नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी कार्यालयात पोहोचले. यावेळी अनेक सामाजिक संघटना, विविध समाज, संस्था यांच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.
नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार प्रविण पडवेकर यांचा भाजपचे उमेदवार किशोर जोरगेवार यांनी २२ हजारांपेक्षा अधिक मतांनी पराभव केला. निवडून आल्यानंतर पक्षश्रेष्ठींच्या आदेशानुसार ते मुंबईत दाखल झाले होते. मतदारसंघात परतताच त्यांनी जनसंपर्क कार्यालयात येऊन नागरिकांच्या समस्या ऐकून घेतल्या.
शहरात स्वच्छतेचा अभाव आणि पाणीपुरवठा यांसारख्या समस्यांवर विशेष लक्ष द्यावे, अशी मागणी नागरिकांनी केली. यानंतर आमदार किशोर जोरगेवार यांनी मनपा आयुक्तांना बोलावून घेऊन आयुक्तांना तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या.
"निवडणुकीदरम्यान प्रचारासाठी फिरत असताना नागरिकांकडून मनपा प्रशासनाविरोधात अनेक तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्या तक्रारी तत्काळ सोडवल्या गेल्या, मात्र अशा तक्रारी वारंवार येणे योग्य नाही. मनपा प्रशासनाने प्रामाणिकपणे लक्ष देत शहर स्वच्छ ठेवावे. अनेक भागांमध्ये लाईट बंद असतात; त्यामुळे कायमस्वरूपी उपाययोजना करावी. तसेच प्रत्येक भागात समान पाणीपुरवठ्यासाठी उत्तम नियोजन करावे," अशा सूचना आमदार जोरगेवार यांनी दिल्या.
दरम्यान, नागरिक, सामाजिक संस्था, विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी यांनी आमदार किशोर जोरगेवार यांची भेट घेत विजयाबद्दल त्यांचा सत्कार केला. यावेळी आमदार जोरगेवार यांनी, "आपल्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. विकासकामांच्या माध्यमातून या विश्वासाची परतफेड करू असे म्हटले.
0 Comments