जिल्ह्यात 100 दिवस क्षयरोग मोहिमेची सुरूवात
◾2 लक्ष 32 हजार 888 संशयित क्षयरुग्णांची होणार तपासणी
चंद्रपूर,( राज्य रिपोर्टर न्युज ) : राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण कार्यक्रम अंतर्गत जिल्ह्यात 100 दिवस क्षयरोग मोहिमेची सुरूवात खासदर प्रतिभा धानोरकर यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून करण्यात आली. वरोरा येथे पार पडलेल्या या कार्यक्रमाला उपविभागीय अधिकारी जेनिथ चंद्रा, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. महादेव चिंचोळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अशोक कटारे, तहसीलदार योगेश कोटकर, श्री साई वर्धा पॉवर जनरेशन लिमिटेडचे वरिष्ठ अधिकारी श्रीकृष्ण किशोर, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. ललितकुमार पटले आदी उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन व रॉबर्ट कॉक यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली.
यावेळी खासदार प्रतिभा धानोरकर यांनी आपले मनोगत व्यक्त करताना उपचारावरील क्षय रुग्णांना पोषण आहार किट उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले. तसेच क्षयरोगाची लक्षणे दिसताच आरोग्य संस्थेमध्ये जाऊन क्षयरोग तपासणी करावी तसेच क्षयरोग झाल्यास वेळेवर उपचार घेण्याचे आवाहन केले.
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अशोक कटारे यांनी 100 दिवस मोहिमेसंदर्भात मार्गदर्शन केले. मोहीम कालावधीत 364 आयुष्यमान आरोग्य मंदिर येथे निक्षय शिबीर व सक्रीय क्षयरुग्ण शोध मोहिमेचे आयोजन करून जोखीमग्रस्त गटातील 2 लक्ष 32 हजार 888 व्यक्तींची व संशयीत क्षयारुग्णांची तपासणी करण्यात येणार आहे, असे सांगितले. यावेळी प्रधानमंत्री टीबी मुक्त भारत अभियान उपक्रमांतर्गत निक्षय मित्र श्री साई वर्धा पॉवर जनरेशन लिमिटेड यांना सन्मानीत करण्यात आले. तसेच खासदारांच्या हस्ते उपचारावरील 10 क्षयरुग्नांना पोषण आहार किटचे वाटप करण्यात आले. सोबतच वरोरा तालुक्यात टीबी चाम्पियन म्हणून क्षयरोगासंबंधित जनजागृती करण्याकरिता सहाय्य करणारे सचिन कामडी यांचाही सत्कार करण्यात आला. या दरम्यान सर्व उपस्थित मान्यवर, अधिकारी, पदाधिकारी, रुग्णालय कर्मचारी यांनी टीबी मुक्त भारत शपथ घेतली.
100 दिवस क्षयरोग मोहिमेमध्ये आयुष्यमान आरोग्य मंदिर येथे निक्षय शिबीर आयोजित करण्यात येत असून यामध्ये जोखीमग्रस्त गटातील लोकसंख्या व संशयीत क्षयरुग्ण यांची क्षयारोगाबाबत NAAT तपासणी व क्ष-किरण तपासणी करण्यात येणार आहे. जोखीमग्रस्त गटातील लोकसंख्येमध्ये खालील व्यक्तींचा समावेश करण्यात आलेला आहे. 1) 60 वर्षावरील व्यक्ती, 2) मधुमेह व्यक्ती, 3) धुम्रपान करणारे व्यक्ती, 4) मागील पाच वर्षामध्ये क्षयरोग झालेले व्यक्ती, 5) क्षय रुग्णांच्या घरातील व्यक्ती, 6) 18 पेक्षा कमी BMI असणारे व्यक्ती, 7) HIV बाधित व्यक्ती.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. ललितकुमार पटले यांनी केले. संचालन सोनाली रासपायले यांनी तर आभार उपजिल्हा रुग्णालय वरोराचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. प्रफुल खुजे यांनी मानले. यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रतिक बोरकर, उपजिल्हा रुग्णालयातील कर्मचारी, तालुका क्षयरोग पथक, जिल्हा क्षयरोग केंद्र कर्मचारी आदी उपस्थित होते.
0 Comments