जंगी शक्तिप्रदर्शन करत आमदार किशोर जोरगेवार यांनी दाखल केला नामांकन अर्ज
◾भाजप महायुतीचे अधिकृत उमेदवार म्हणून असणार निवडणूक रिंगणात
चंद्रपुर ( राज्य रिपोर्टर न्यूज ) : आज दि.28/10/2024 सोमवारी, आमदार किशोर जोरगेवार यांनी असंख्य कार्यकर्त्यांसह जंगी शक्तिप्रदर्शन करत भाजप महायुतीचे अधिकृत उमेदवार म्हणून नामांकन अर्ज दाखल केला. यावेळी निघालेल्या रॅलीचे विविध ठिकाणी पुष्पवर्षाव करून स्वागत करण्यात आले.
यावेळी भाजप नेते तथा राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर, भाजपचे महानगर जिल्हाध्यक्ष राहुल पावडे, भाजप चंद्रपूर विधानसभा प्रमुख प्रमोद कडू, शिवसेना जिल्हा प्रमुख बंडू हजारे, राष्ट्रवादी काँग्रेसचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष नितीन भटारकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष राजीव कक्कड, अशोक जीवतोडे, चंद्रपूर जिल्हा महानगर प्रमुख भरत गुप्ता, शिवसेना महिला जिल्हा प्रमुख प्रतिमा ठाकूर, आरपीआय (आठवले गट) चे गौतम तोडे, हरीश दुर्योधन, भाजपचे जिल्हा सरचिटणीस प्रज्वलंत कडू, सूरज पेदुलवार, भाजप महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष सविता कांबळे, प्रकाश देवतडे, वंदना हातगावकर, अमोल शेंडे, सलीम शेख, राशिद हुसेन, सविता दंढारे, सायली येरणे, विमल काटकर आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
चंद्रपूरचे अपक्ष आमदार यांनी नुकताच भाजपमध्ये प्रवेश केला आहे. आता ते भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ( आठवले गट ) आणि मित्रपक्ष महायुतीच्या वतीने चंद्रपूर विधानसभा क्षेत्राचे अधिकृत उमेदवार म्हणून घोषित झाले असून आज सोमवारी त्यांनी भव्य मिरवणूक काढत आपला नामांकन अर्ज दाखल केला आहे. यावेळी निघालेल्या मिरवणुकीचे सर्वधर्मीयांच्या वतीने ठिकठिकाणी जेसीबीच्या सहाय्याने पुष्पवर्षाव करून स्वागत करण्यात आले. दुपारी आमदार किशोर जोरगेवार यांच्या कार्यालयातून सदर मिरवणुकीला सुरुवात झाली. यावेळी महायुतीतील हजारो कार्यकर्ते आणि जोरगेवार समर्थक सहभागी झाले होते.
सदर भव्य मिरवणूक शहराच्या मुख्य मार्गाने होत जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ पोहोचली. त्यानंतर आमदार किशोर जोरगेवार यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करताना सांगितले की, आपण दाखविलेल्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. मागील पाच वर्षांत आपण अनेक विकासकामे करू शकलो असून काही कामे प्रगतीपथावर आहेत. या कामांनाही प्राधान्याने पूर्ण करायचे आहे. सुरू झालेला हा विकासपर्व अधिक गतीशील करायचा आहे, यासाठी आपली साथ आणि आशीर्वाद असाच राहावा, अशी विनंती केली. त्यानंतर त्यांनी आपला निवडणूक नामांकन अर्ज निवडणूक अधिकाऱ्यांकडे सादर केला.
0 Comments