आ. किशोर जोरगेवार यांच्या हस्ते दीक्षाभूमीच्या विकासकामासह १०१ कोटी ९० लाख रुपयांच्या विविध कामांचे भूमिपूजन
◾वढा तीर्थक्षेत्राचा होणार विकास, धानोरा बॅरेजला प्रशासकीय मान्यता प्राप्त
चंद्रपूर ( राज्य रिपोर्टर न्युज ) : आ. किशोर जोरगेवार यांच्या हस्ते मतदारसंघातील १०१ कोटी ९० लाख रुपयांच्या विकासकामांचे भूमिपूजन करण्यात आले. यामध्ये दीक्षाभूमी विकासकाम आणि वढा तीर्थक्षेत्राच्या विकासकामाचाही समावेश आहे.
मागील पाच वर्षांत आ. किशोर जोरगेवार यांनी मतदारसंघाच्या विकासासाठी शासनाकडून मोठा निधी खेचून आणला आहे. या निधीतून शहरी भागासह ग्रामीण भागाचा विकास केला जात आहे. दरम्यान, आज आ. किशोर जोरगेवार यांनी मतदारसंघातील तब्बल १०१ कोटी ९० लाख रुपयांच्या कामाचे भूमिपूजन केले आहे. आ. किशोर जोरगेवार यांचा चंद्रपूरच्या दीक्षाभूमीच्या विकासाचा संकल्पही पूर्ण झाला असून ५६ कोटी ९० लाख रुपयांतून होणाऱ्या दीक्षाभूमीच्या विकासकामाचे भूमिपूजन त्यांच्या हस्ते करण्यात आले आहे. तसेच वढा येथील २५ कोटी रुपयांच्या विकासकामाचेही भूमिपूजन करण्यात आले आहे. विदर्भाचे पंढरपूर मानल्या जाणाऱ्या वढा तीर्थक्षेत्राचा व्यापक विकास करण्याचा संकल्प आ. किशोर जोरगेवार यांनी केला होता. या कामासाठी २५ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे, आणि त्याचेही आज भूमिपूजन करण्यात आले आहे. शहरातील प्रमुख मार्गासाठी मंजूर २० कोटी रुपयांच्या कामाचेही आ. जोरगेवार यांनी भूमिपूजन केले असून, या मार्गाचे कामही तातडीने सुरू होणार आहे.
आ. किशोर जोरगेवार यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर धानोरा बॅरेजला प्रशासकीय मान्यता
चंद्रपूर जिल्ह्यातील धानोरा गावाजवळील वर्धा नदीवर बॅरेज बांधण्यासाठी निधी उपलब्ध करण्याची मागणी चंद्रपूर मतदारसंघाचे अपक्ष आ. किशोर जोरगेवार यांनी सातत्याने लावून धरली होती. त्यांच्या या मागणीला यश मिळाले असून, या कामाला प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. पहिल्या टप्यात ५ कोटी ४२ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
0 Comments