पारदर्शक, खुल्या, मुक्त व निर्भय वातावरणात होईल निवडणुका
◾ निवडणूक निरीक्षकांनी व्यक्त केला विश्वास
◾ नियोजन भवन येथे पूर्व तयारीचा आढावा
चंद्रपूर, ( राज्य रिपोर्टर न्युज ) : भारत निवडणूक आयोगाने चंद्रपूर जिल्ह्यातील सहाही विधानसभा मतदारसंघासाठी नियुक्त केलेल्या निवडणूक निरीक्षकांनी जिल्ह्यातील संपूर्ण निवडणूक प्रक्रियेचा आढावा घेऊन संबंधितांना सुचना केल्या. तसेच जिल्हा प्रशासनाची टीम उत्तम असून राजकीय पक्षांमध्येसुध्दा येथे सौहार्दाचे वातावरण आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुका पारदर्शक पध्दतीने खुल्या, मुक्त आणि निर्भयपूर्ण वातावरणात होईल, असा विश्वास निवडणूक निरीक्षकांनी व्यक्त केला.
नियोजन सभागृह येथे पार पडलेल्या बैठकीला सामान्य निवडणूक निरीक्षक संजयकुमार, आर. मुत्यालाराजु रेवु, संगिता सिंग, कायदा व सुव्यवस्था निवडणूक निरीक्षक अवधेश पाठक, खर्च पथक निवडणूक निरीक्षक आदित्य बी. आणि धमेंद्र सिंह यांच्यासह जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी., मुख्य वनसंरक्षक डॉ. जितेंद्र रामगावकर, मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन, जिल्हा पोलिस अधिक्षक मुम्मका सुदर्शन, अपर जिल्हाधिकारी श्रीकांत देशपांडे, अपर पोलिस अधीक्षक रिना जनबंधू, उपजिल्हा निवडणूक अधिकारी सुभाष चौधरी आदी उपस्थित होते.
यावेळी सामान्य निवडणूक निरीक्षक संजयकुमार म्हणाले, आगामी विधानसभा निवडणुका खुल्या आणि मुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी सर्वांनी समन्वयाने काम करावे. दिव्यांग मतदारांचे मतदान आणि 85 वर्षांवरील नागरिकांच्या गृहमतदानावर विशेष लक्ष द्यावे. सर्व मतदान केंद्रात किमान मुलभूत सुविधा त्वरीत पूर्ण करा. नागरिकांमध्ये मतदान जनजागृतीकरीता महानगर पालिका, नगर परिषद, नगर पंचायत, ग्रामपंचायत आदींनी स्वीप उपक्रम वाढवावे. बाजारपेठेत व इतर गर्दीच्या ठिकाणी मतदान जनजागृती करावी.
आंतरराज्यीय चेक पोस्टसह जिल्ह्यातील सर्व चेक पोस्टवर गांभिर्याने तपासणी करावी. दारू, रक्कम, ड्रग्ज, अवैध मार्गाने येणा-या वस्तुंची जप्ती करावी. सी-व्हिजीलवर येणा-या तक्रारींची तात्काळ दखल घ्यावी. निवडणूकीच्या कामात असलेल्या अधिकारी व कर्मचा-यांच्या टपाली मतदानाची टक्केवारी वाढवावी. सोशल मिडीयावर विशेष लक्ष देऊन आचारसंहितेचा भंग होणार नाही, याची विशेष दक्षता घ्यावी. तसेच निवडणूक प्रक्रियेकरीता अधिकारी व कर्मचा-यांचे उत्तम प्रशिक्षण घ्यावे. जेणेकरून निवडणुकीमध्ये कोणतीही अडचण येणार नाही, अशा सुचना सामान्य निरीक्षक संजयकुमार यांनी दिल्या.
सामान्य निवडणूक निरीक्षक आर. मुत्यालाराजू रेवू म्हणाले, मतदार चिठ्ठी वाटप 100 टक्के करा. मतदारांना मतदानासाठी कोणतीही अडचण जावू नये. संगिता सिंग म्हणाल्या, मतदान केंद्रांची किरकोळ दुरुस्ती त्वरीत पूर्ण करारी. दिव्यांग मतदारांसाठी रॅम्प सुव्यवस्थित असावे. कायदा व सुव्यवस्था निरीक्षक अवधेश पाठक म्हणाले, स्ट्राँग रुमची सुरक्षा व्यवस्था सर्वोच्च असावी. चेकपोस्टसह सर्व नाके, रस्त्यांवर नाईट पेट्रोलिंग वाढवावी. खर्च पथक निवडणूक निरीक्षक आदित्य बी. म्हणाले, वाहनांची परवानगी किती वेळेसाठी आहे, त्यानुसारच दर आकारण्याचे नियोजन करावे. धर्मेंद्र सिंह म्हणाले, विधानसभा मतदारसंघनिहाय खर्च पथकामध्ये मनुष्यबळ वाढविणे गरजेचे आहे.
यावेळी जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी जिल्ह्यातील निवडणूक विषयक पूर्वतयारीचे सादरीकरण केले. बैठकीला निवडणूक निर्णय अधिकारी, सहायक निवडणूक अधिकारी, उपविभागीय पोलिस अधिकारी, विविध विभागाचे नोडल अधिकारी आदी उपस्थित होते.
राजकीय पक्षाच्या प्रतिनिधींशी संवाद : तत्पुर्वी निवडणूक निरीक्षकांनी राजकीय पक्षाच्या प्रतिनिधींशी वीस कलमी सभागृह येथे संवाद साधून सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली. निवडणुकीदरम्यान ज्या ठिकाणी गडबडीची शक्यता, पैसे, दारु पुरवठा आदी संशयास्पद बाबी आढळल्या तर लगेच जिल्हा प्रशासनाशी किंवा निवडणूक निरीक्षकांसोबत संपर्क साधावा, अशा सुचना त्यांनी केल्या.
0 Comments