बल्लारपुर तालुक्यातील कोठारीत बनावट सातबाराच्या आधारे भूखंड हडप







बल्लारपुर तालुक्यातील कोठारीत बनावट सातबाराच्या आधारे भूखंड हडप

◾सहकारी संस्थेचा भूखंड हडपण्याच्या प्रयत्न करणाऱ्यावर कोठारी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल 

बल्लारपूर ( राज्य रिपोर्टर न्युज ) : बल्लारपुर तालुक्यातील कोठारी येथे बनावट सातबारा तयार करून सहकारी संस्थेचा भूखंड हडपण्याच्या प्रयत्न करणाऱ्यावर कोठारी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्ह्याची नोंद कोठारी चे तलाठी राजेश आकोजवार यांच्या तक्रारीवरून करण्यात आली आहे.

      कोठारी येथील विविध कार्यकारी सहकारी संस्था मर्यादित कोठारी र. नं ७४४ संस्थेने रामदास श्रीनिवास मोरे यांच्याकडून १९६१ ला मौजा कोठारी सर्व्हे नं. १, आराजी ०.०३ जागा खरेदी केली होती. सदर जागा राष्ट्रीय महामार्गाच्या लगत असून अनेक वर्षांपासून रिकामी होती. या जागेवर संजय खाडिलकर यांची भूखंडावर अतिक्रमण करून स्वतःच्या नावाचा बोर्ड लावले होते. संस्थेने या प्रकाराची तक्रार संबंधित विभागाकडे करीत संस्थेच्या जागेवरील अतिक्रमण हटविण्याची मागणी केली. बल्लारपूर उपविभागीय अधिकाऱ्यांनी अतिक्रमण हटविण्याचे आदेश पारित केले. या आदेशान्वये तहसीलदार यांच्या उपस्थितीत संजय वामन खाडिलकर यांच्या नावाचा बोर्ड हटविण्याची कार्यवाही करण्यात आली.

       दरम्यान, उपविभागीय दंडाधिकारी यांच्या आदेशाविरुद्ध जिल्हा न्यायालय चंद्रपूर येथे संजय वामन खाडिलकर यांनी दाद मागितले. सध्या प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. दरम्यान, उपविभागीय दंडाधिकारी कार्यालय बल्लारपूर येथे इस्तेगाशा क्र. ०१/२०२१ कलम १४५ जा. फौ. प्रकरणामध्ये खाडिलकर यांनी ७/१२ सादर केला होता. त्याची चौकशी मंडळ अधिकारी, तहसीलदार यांनी केली असता, सदर सातबारा बनावट असल्याचा अहवाल दिला.

      या अहवालानुसार उपविभागीय दंडाधिकारी कार्यालय बल्लारपूर यांनी याबाबत पोलिसांत गुन्हा नोंदविण्याचा आदेश तहसीलदारांना दिला. तहसीलदारांच्या पत्रानुसार कोठारीच्या तलाठ्याने २ सप्टेंबरला कोठारी पोलिसांत बनावट सातबारा संदर्भात तक्रार दाखल केली. कोठारीचे ठाणेदार खरसान यांनी संजय खाडिलकर यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ कलम ३१८, ३३६ (३) व कलम ३४० अन्वये गुन्हा दाखल केला आहे.




Post a Comment

0 Comments