250 कोटी रुपयांतून माता महाकाली मंदिर यात्रा परिसराचे विकास होणार - आमदार किशोर जोरगेवार

 







250 कोटी रुपयांतून माता महाकाली मंदिर यात्रा परिसराचे विकास होणार - आमदार किशोर जोरगेवार

◾आमदार किशोर जोरगेवार यांच्या मागणी नंतर, मुख्यमंत्री यांची घोषणा

        चंद्रपूर ( राज्य रिपोर्टर ) : लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या चंद्रपूरची आराध्य दैवत माता महाकाली मंदिराच्या विकासासाठी आमदार किशोर जोरगेवार यांचे सातत्याने प्रयत्न सुरू होते. या कामासाठी 250 कोटी रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला होता. शुक्रवारला अधिवेशनात बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सदर काम करण्याबाबत घोषणा केली आहे त्यामुळे आता लवकरच 250 कोटी रुपयांतून माता महाकाली मंदिर यात्रा परिसराचे रुपडे पालटणार आहे.
          आमदार किशोर जोरगेवार यांनी चंद्रपूर येथील पवित्र दीक्षाभूमी आणि माता महाकाली मंदिर परिसर या भागाचा सर्वसमावेशक विकास व्हावा यासाठी प्रयत्न सुरू केले होते. त्यांच्या प्रयत्नांमुळे दीक्षाभूमी येथील विकास कामांना मंजुरी मिळाली असून यासाठी 56.90 कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे. लवकरच या कामाला सुरुवात होणार आहे. तर माता महाकाली मंदिर परिसराच्या विकासासाठी त्यांच्या पाठपुराव्यानंतर 250 कोटी रुपयांचा विकास आराखडा तयार करण्यात आला होता.
          चंद्रपूर ची आराध्य दैवत श्री महाकाली मातेचे १६ व्या शतकातील प्राचीन जागृत असे मंदिर गोंड राजवंशाने बांधले आहे. दरवर्षी चैत्र शुद्ध प्रतिपदेला चैत्र नवरात्री दरम्यान महाकाली यात्रा सुरू होते. या यात्रेमध्ये नांदेड, मराठवाडा सह तेलंगाना, आंध्रप्रदेश, छत्तीसगड या राज्यातूनही लाखोच्या संख्यने भाविक यात्रेसाठी येत असतात. वर्षातील चैत्र नवरात्री व अश्विनी नवरात्री या दोन्ही नवरात्री दरम्यान श्री महाकाली माता मंदिर परिसरात लाखोंच्या संख्येने भाविक येत असतात. परंतु सदर यात्रा परिसरात भाविकांसाठी मुलभूत सोयी सुविधा उपलब्ध नाहीत. यात्रेकरुंच्या संख्येच्या तुलनेत निवास, शौचालय, स्नानगृहे, भोजनकक्ष व्यवस्था नसल्यामुळे महिला भाविकांना उघड्यावरच दैनंदिन कार्य उरकावे लागत आहे. तसेच ऊन, वारा व पावसापासून संरक्षित सभामंडप नसल्यामुळे नैसर्गिक आपत्तीमुळे भाविकांच्य जीवितास हानी होण्याची शक्यता असते. त्यामुळे यात्रा परिसरात भाविकांसाठी आधुनिक सुविधांसह विकासाकामांची गरज होती. मुख्यमंत्री यांच्या घोषणेनंतर 250 कोटी रुपयांच्या या आराखड्यानुसार मंदिर परिसरात शेड व शौचालयाचे बांधकाम, मंदिर परिसर प्रवेशद्वार व सीमा भिंतीचे बांधकाम, पाईपलाइन व पाण्याच्या टाकीचे काम, मंदिर परिसरात विद्युतीकरण, भक्त निवास आदी कामे प्रस्तावित करण्यात आली आहेत. यासाठी आमदार किशोर जोरगेवार यांचे सातत्याने प्रयत्न सुरू होते. अखेर त्यांच्या पाठपुराव्याला यश आले आहे.
         पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी अधिवेशनात बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सदर 250 कोटी रुपयांच्या विकास आराखड्यानुसार विकासकामे करण्याची घोषणा केली. त्यामुळे आता मंदिर यात्रा परिसराच्या विकास कामाला गती येणार आहे. विशेष म्हणजे आश्विन नवरात्री दरम्यान आमदार किशोर जोरगेवार यांनी चंद्रपूरात माता महाकाली महोत्सवाला सुरुवात केली आहे. या महोत्सवाच्या भव्यतेमुळे माता महाकाली देवस्थान देशपातळीवर पोहोचले आहे. परिणामी येथे येणाऱ्या भाविकांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. याचा परिणाम येथील व्यवसायावरही दिसून येत आहे. जगप्रसिद्ध ताडोबा अभयारण्यात येणाऱ्या पर्यटकांना आणि इतर पर्यटकांना माता महाकाली मंदिराकडे वळविण्यासाठी सदर महोत्सवाच्या माध्यमातून प्रयत्न सुरू आहेत. मात्र येथे येणाऱ्या भाविकांच्या सोयीसुविधांच्या दृष्टीने येथे व्यवस्था नाहीत. त्यामुळे भाविकांच्या सोयीसाठी येथे विकासकामे केले जाणे अपेक्षित होते.
        दरम्यान, आता श्री महाकाली मंदिर यात्रा परिसराचा सर्वांगीण विकासाची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केल्याने येथे सोयी सुविधा उपलब्ध होणार आहेत. याचा फायदा येथील व्यवसाय वाढ, रोजगार निर्मिती, पर्यटन आदी क्षेत्रांवर दिसून येणार आहे. मंदिर परिसराचा विकास व्हावा, येथे येणाऱ्या भाविकांसाठी उत्तम भक्त निवास असावा हा संकल्प आपण केला होता. मुख्यमंत्री यांची  घोषणा ही या संकल्प पूर्ततेकडील वाटचाल असून चंद्रपूरच्या नागरिकांच्या आणि महाकाली मातेच्या भक्तांच्या वतीने आपण मुख्यमंत्री यांचे आभार मानतो, असे किशोर जोरगेवार यांनी म्हटले आहे.





Post a Comment

0 Comments