एकाच दिवशी फेरफार खारीजसाठी नोटीस आणि जाहीरनामा

 



एकाच दिवशी फेरफार खारीजसाठी नोटीस आणि जाहीरनामा

◾वरोऱ्याचे एसडीओ आणि भद्रावतीच्या तहसीलदारांकडून शेतकऱ्यांची दिशाभूल : विनोद खोब्रागडे यांचा पत्रकार परिषदेत आरोप

चंद्रपूर ( राज्य रिपोर्टर ) : भद्रावती येथील मे. अरविंदो रियॉलिटी या कंपनीसाठी शेतकऱ्यांना कोणतीही सूचना न देता परस्पर बोगस फेरफार घेण्यात आले. ही बाब निदर्शनास आल्यानंतर ॲड. विनोद खोब्रागडे आणि शेतकऱ्यांनी एसडीओंकडे आक्षेप नोंदविला. यानंतर एसडीओंनी १७ मे रोजी नोटीस काढून २६ मेपर्यंतउत्तर मागविले आहे. तर याच दिवशी भद्रावतीच्या तहसीलदारांनी जमीन संपादनासाठी नोटीस काढली आहे. हा प्रकार म्हणजे शेतकऱ्यांची दिशाभूल करणारा असून, एसडीओ आणि तहसीलदार यांच्या संगनमताने शेतकऱ्यांची फसवणूक सुरू असल्याचा आरोप ॲड. विनोद खोब्रागडे आणि शेतकऱ्यांनी चंद्रपूर श्रमिक पत्रकार भवनात आयोजित पत्रकार परिषदेत केला आहे.

भद्रावती तालुक्यातील बेलोरा येथील मे. अरविंदो रियॉलिटी आणि इन्स्प्रास्ट्रक्चक्चर प्रा. लि. ही कंपनी मागील अनेक वर्षांपासून अवैधपणे कोळशाचे उत्खनन करीत आहे. रोज २०० ट्रक कोळसा काढला जात आहे. ही जागा डागा कंपनीला देण्यात आली होती. परंतु, डागा कंपनीचे काम बंद पाडल्यानंतर येथे अरविंदो कंपनीकडून उत्खनन सुरू आहे. कंपनीने बेलोरा, पानवडाळा, जेना, निवली, टाकळी, गोवारदिप रिठ येथील घेण्यात आलेले फेरफार बोगस असून, हे फेरफार खारीज करण्यासाठी विनोद खोब्रागडे व बेलोरा येथील शेतकऱ्यांनी एसडीओ यांच्या न्यायाचलयात अपिल दाखल केले होते. याअपिलनंतर एसडीओंनी नोटीस काढली आहे. तर दुसरीकडे याच दिवशी तहसीलदार यांना कोणतेही अधिकार नसताना त्यांनी सरकारी जमीन देण्यासाठी जाहीरनामा काढला. 

शेतकऱ्यांना ही बाब माहिती होताच शेतकऱ्यांनी भद्रावती तहसील कार्यालयात आक्षेप नोंदविले आहे. कंपनीसोबतच मंडळ अधिकारी, तलाठी, सेवानिवृत्त झालेले महसूल अधिकारी यांच्या संगनमतातून कंपनीसाठी बोगस कागदपत्रे तयार केली जात असून, शेतकऱ्यांची फसवणूक सुरू आहे. त्यामुळे बोगस कागदपत्राच्या आधारे शेतकऱ्यांची जमीन बळकावणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात यावे, बेलोरा गावाचे आधी पुनर्वसन करण्यात यावे, पुनर्वसन झाल्याशिवाय कंपनीने कोणतेही उत्खनन करू नये आणि शेतकऱ्यांना कायदा हातात घेण्याची वेळ येऊ देऊ नये, याची दखल जिल्हा प्रशासनाने घ्यावी असा इशाराच खोब्रागडे यांनी पत्रकार परिषदेत दिला आहे. पत्रकार परिषदेला विलास परचाके, प्रशांत मत्ते, बंडू आगलावे, प्रवीण मत्ते, संभा देहारकर, प्रशांत पांडुरंग मत्ते उपस्थित होते.




Post a Comment

0 Comments