किरकोळ भाजीपाला विक्रेत्यांचे २६ मार्चपासून रस्ता रोको आंदोलन

 




किरकोळ भाजीपाला विक्रेत्यांचे २६ मार्चपासून रस्ता रोको आंदोलन

'कृउबास'च्या भाजीयार्डमधील व्यापाऱ्यांविरोधात रोष

चंद्रपूर ( राज्य रिपोर्टर ) : मागील काही दिवसांपासून गंजवॉर्डातील किरकोळ भाजीपाला व्यावसायिक, हातठेलेधारक आणि कृषी उत्पन्न बाजार समितीतील ठोक व्यापारी यांच्यात वाद सुरू आहे. भाजीयार्डमध्ये ठोक व्यापाऱ्यांकडून किरकोळ व्यवसाय केला जात असल्याने गंजवॉर्डातील भाजीबाजार प्रभावित होत असून, अनेक व्यावसायिकांवर उपासमारीचे संकट ओढावले आहे. याविरोधात किरकोळ भाजीपाला व्यावसायिकांनी वारंवार कृषी उत्पन्न बाजार समिती प्रशासन, जिल्हाधिकारी आणि पोलीस प्रशासनाला निवेदन देऊन भाजीयार्डमधील किरकोळ भाजीपाला विक्री बंद करण्याची मागणी केली. मात्र, यानंतरही येथे किरकोळ बाजीबाजार सुरू असून, याविरोधात २६ मार्चपासून बेमुदत बंद, ठिय्या आंदोलन आणि रस्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा शुक्रवारी पत्रकार परिषदेत हिमायू अली यांच्यासह व्यावसायिकांनी दिला.

'कृउबास'च्या भाजीयार्डमधील किरकोळ भाजीपाला विक्री थांबविण्यासाठी आतापर्यंत श्री महात्मा ज्योतिबा फुले भाजी विक्रेता उपबाजार संघटना चंद्रपूर यांनी कृउबासला निवेदन दिले आहे. यानंतर येथील मोठ्या व्यापाऱ्यांच्या किरकोळ भाजीविक्रीला पाठबळच दिले जात आहे. त्यामुळे काही दिवसांपूर्वी संघटनेने १२ फेब्रुवारीपासून तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिल्यानंतर १० फेब्रुवारी रोजी कृउबासने लेखी लिहून देत यापुढे येथील भाजीपाला यार्डमध्ये किरकोळ भाजीपाला विक्री होणार नाही, असे आश्वासन दिले होते. परंतु, यानंतरही येथे किरकोळ भाजीपाल विक्री सुरूच असून, येथील मोेठे व्यापारी मनमानी करीत असल्याचा आरोप या पत्रकार परिषदेत करण्यात आला.

ठोक विक्रेतेच किरकोळ व्यवसाय करीत असेल तर किरकोळ व्यावसायिकांनी काय करायचे असा प्रश्न उपस्थित करीत गंजवॉॅर्डातील किरकोळ व्यावसायिकांनी मोठ्या व्यापाऱ्याविषयी आक्रमक भूमिका घेतली आहे. पुन्हा एकदा किरकोळ व्यावसायिकांच्या संघटनेने १६ मार्च रोजी जिल्हाधिकारी, जिल्हा उपनिबंधक, कृषी उत्पन्न बाजार समिती सचिव, पोलीस अधीक्षक, रामनगर पोलीस ठाणे यांना निवेदन देत १२ फेब्रुवारी रोजी बैठकीत ठरलेल्या ठरावाप्रमाणे भाजीपाला यार्डमधील किरकोळ व्यवसाय बंद करण्यात यावा, अन्यथा २६ मार्चपासून बेमुदत बंद, ठिय्या आंदोलन आणि भाजीयार्डच्या प्रवेशद्वारासमोर रस्ता रोको आंदोलन करण्यात येईल, असा इशारा यावेळी देण्यात आला. पत्रकार परिषदेला हिमायू अली यांच्यासह पुरुषोत्तम साखरकर, शैलेश खनके, आमिर शेख, रुपेश देऊळकर, आशिष वासेकर, शैलेश दानव, सागर निरगुडवार, शैलेश कर्णेवार उपस्थित होते.





Post a Comment

0 Comments