राजकीय पक्ष आणि उमेदवारांनी आदर्श आचारसंहितेचे पालन करावे
Ø जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली राजकीय पक्षांची आढावा बैठक
चंद्रपूर ( राज्य रिपोर्टर ) : निवडणुका ह्या लोकशाहीचा प्रमुख केंद्रबिंदू असून नि:पक्ष आणि मुक्त वातावरणात निवडणूक पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज आहे. त्यासाठी सर्व राजकीय पक्ष आणि उमेदवारांनी आदर्श आचारसंहितेचे पालन करावे, असे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयात राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते. बैठकीला उपजिल्हा निवडणूक अधिकारी सुभाष चौधरी, उपजिल्हाधिकारी ( भुसंपादन ) तथा जिल्हा निवडणूक संपर्क योजना कक्षाचे नोडल अधिकारी दगडू कुंभार, मुख्य लेखा व वित्त अधिकारी तथा खर्च पथक नोडल अधिकारी अतुल गायकवाड, जिल्हा माहिती अधिकारी राजेश येसनकर आदी उपस्थित होते.
केंद्रीय निवडणूक आयोगाने 16 मार्च 2024 रोजी लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार 13 - चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाची सार्वत्रिक निवडणूक 19 एप्रिल 2024 रोजी होणार असून जिल्ह्यात आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सुचनेनुसार सर्व राजकीय पक्ष आणि उमेदवारांनी आदर्श आचारसंहितेचे पालन करणे आवश्यक आहे. आचारसंहितेचे कुठेही त्याचे उल्लंघन होणार नाही, याबाबत सर्वांनी काळजी घ्यावी. तसेच प्रचारादरम्यान प्रक्षोभक आणि द्वेष पसरविणारी भाषणे करू नये.
पुढे जिल्हाधिकारी श्री. गौडा म्हणाले, नामनिर्देशन पत्र दाखल करतांना उमेदवारांच्या वाहनासह जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात केवळ तीनच वाहनांना परवानगी राहील. तसेच उमेदवारासह केवळ पाचच लोकांना आतमध्ये प्रवेश दिला जाईल. राजकीय पक्षांना विविध परवानग्यांसाठी जिल्हास्तरावर तसेच विधानसभा मतदारसंघ स्तरावर ‘एक खिडकी’ सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. याशिवाय निवडणूक आयोगाच्या ‘सुविधा’ पोर्टलवरसुध्दा ऑनलाईन परवानगी घेता येणार आहे, असे जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी सांगितले.
यावेळी खर्च पथकाचे नोडल अधिकारी अतुल गायकवाड यांनी उमेदवार आणि राजकीय पक्षांनी करावयाच्या खर्चाबाबत, नोडल अधिकारी दगडू कुंभार यांनी नामनिर्देशन पत्र दाखल करण्याबाबत तर जिल्हा माहिती अधिकारी यांनी माध्यम प्रमाणीकरण आणि सनियंत्रण समितीबाबत मार्गदर्शन केले.
या राजकीय पक्षांचे प्रतिनिधी होते उपस्थित : भारतीय जनता पक्ष, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ( शरदचंद्र पवार ), शिवसेना ( उध्दव बाळासाहेब ठाकरे ), आम आदमी पक्ष, कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया, भारतीय रिपब्लिकन पक्ष, ऑल इंडीया रिपब्लिक पक्ष, यंग चांदा ब्रिगेड, जनसेवा गोंडवाना पाटी, एआयएमआयएम.
0 Comments