संगणक परिचालकांचे दीड महिन्यांपासून कामबंद आंदोलन

 




संगणक परिचालकांचे दीड महिन्यांपासून कामबंद आंदोलन

◾सरकार दुर्लक्ष करीत असल्याचा संगणक परिचालक संघटनेचा आरोप

चंद्रपर ( राज्य रिपोर्टर ) : संगणक परिचालकांच्या विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी मागील ४८ दिवसांपासून कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन सुरू केले आहे. मात्र, सरकार जाणिवपूर्वक या आंदोलनाकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप करीत, यापुढे आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा महाराष्ट्र राज्य संगणक परिचालक संघटनेने चंद्रपूर श्रमिक पत्रकार भवनात आयोजित पत्रकार परिषदेत दिला आहे.

राज्यभरातील ग्रामपंचायती संगणकाने जोडण्यात आल्या आहेत. यासाठी प्रत्येक ग्रामपंचायत स्तरावर एका संगणक परिचालकाची नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्ह्यातील ८२५ ग्रामपंचायत कार्यालयात कार्यरत सर्व संगणक परिचालक मागील ४८ दिवसांपासून कामबंद आंदोल करीत आहे. त्यामुळे ग्रामपंचायतींची अनेक कामे खोळंबली असून, अनेक ऑनलाइन दाखल्यांपासून नागरिक वंचित आहेत. परंतु, अनेक ठिकाणी तालुका व्यवस्थापक, जिल्हा व्यवस्थापक, ग्रामसेवक, सरपंच, खासगी सीएससी केंद्रचालक हे संगणक परिचालकांचे काम मनमर्जीने करीत आहे. या काळात काही गैरप्रकार झाल्यास संगणक परिचालक याला जबाबदार राहणार नाही, असा इशारा सावेळी देण्यात आला.

संगणक परिचालकांना अल्पमोबदला दिला जात आहे. तोसुद्ध वेळेवर मिळत नाही. ग्रामपंचायतची सर्वच काम संगणक परिचालकांकडून करवून घेतल्या जातात. त्यामुळे संगणक परिचालकांचा मानसिक छळ होत असून, आजपर्यंत पाचहून अधिक संगणक परिचालकांनी मानसिक तणावातून आत्महत्या केल्या आहेत. अनेकदा कामावरून काढून टाकण्याची धमकी संगणक परिचालकांना दिली जाते. त्यामुळे संगणक परिचालक दबावात काम करीत आहे. संगणक परिचालकांना यावलकर समितीच्या शिफारशीनुसार सुधारित आकृतीबंधामध्ये संगणक परिचालक म्हणून पदनिश्चिती करून कर्मचारी दर्जा व किमान वेतन लागू करण्यात यावे, यावलकर समितीच्या शिफारशी लागू करेपर्यंत २० हजार रुपये मासिक मानधन देण्यात यावे, आदी मागण्या तत्काळ सोडविण्यात यावा, अन्यथा कामबंद आंदोलन पुढेही सुरू राहील असा इशारा यावेळी देण्यात आला. पत्रकार परिषदेला संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रशांत डवले, उपाध्यक्ष सचिन पाल, मोहना धोटे व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.




Post a Comment

0 Comments