धोपटाळा पारधीगुड्यातील ग्रामस्थांचा अवैध दारूविक्रेत्यांविरोधात 'एल्गार'

 






धोपटाळा पारधीगुड्यातील ग्रामस्थांचा अवैध दारूविक्रेत्यांविरोधात 'एल्गार'

◾पोलीस पाटील, कोरपना पोलिसांचेही दुर्लक्ष : दारूविक्रीविरोधात ग्रामस्थ एकवटले

चंद्रपूर ( राज्य रिपोर्टर ) : कोरपनापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या धोपटाळाच्या पारधीगुड्यात मागील काही महिन्यांपासून काही दारूविक्रेते अवैधपणे दारू विकत आहे. या दारूविक्रीविरोधात स्थानिक पोलीस पाटील, कोरपना पोलिसांकडे अनेकदा तक्रारी करण्यात आल्या आहेत. मात्र, कोणतीही कारवाई होत नाही. त्यामुळे स्थानिक नागरिक चांगलेच संतप्त झाले असून, गावातील अवैध दारूविक्रेत्यांविरोधात ग्रामस्थांनी एल्गार पुकारला आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी तत्काळ दखल घेऊन दारू बंद करण्याची मागणी स्थानिकांनी चंद्रपुरात आयोजित पत्रकार परिषदेत केली.

धोपटाळा ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या पारधीगुड्यात साडेतीनशेवर नागरिक राहतात. शिकार करून उदरनिर्वाह करणे हा मूळव्यवसाय असला तरी आता कोणीच शिकार करीत नाही. शेती आणि मजुरी करून या कुटुंबीयांचा उदरनिर्वाह सुरू आहे. पारधीगुडा विकासापासून कोसोदूर आहे. ग्रामपंचायतला निधी आला तरी तो अन्य भागात खर्च केला जातो. शाळा चौथीपर्यंत असून, उर्वरित शिक्षणासाठी कोरपना येथे जावे लागते. मात्र, गावातील अवैध दारूविक्रीमुळे या पारधीगुड्यातील शांतता आणि सुव्यवस्था धोक्यात आली आहे. अनेक शालेय विद्यार्थी दारूच्या आहारी गेले आहेत. वारंवार दारूविक्रेत्यांना दारूविक्री बंद करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मात्र, दारूविक्रेते अरेरावी करतात. जिवे मारण्याची धमकी देतात. शुक्रवारी एका महिलेची दारू काही युवकांनी पकडली. पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी थातूरमातूर कारवाई करून महिलेची सुटका केली. यानंतर युवकांनी पकडलेली दारूच ती महिला विकत होती. त्यामुळे कोरपना पोलिसांची भूमिका संशय निर्माण करणारी असल्याचा आरोप पत्रकार परिषदेत पारधीगुड्यातील नागरिकांनी केला.

दारूविक्रेत्यांवर कारवाईसाठी पोलिसांकडून होणारे दुर्लक्ष, दारूविक्रेत्यांची गुंडगिरी यामुळे नागरिक आता चांगलेच त्रस्त झाले आहे. पोलिसांनी स्थानिकांच्या मागणीची दखल घेऊन वेळीच दारूविक्रेत्यांवर कठोर कारवाई केली नाही. तर मोठे आंदोलन करू, यानंतर उद्भवलेल्या परिस्थितीस पोलीस प्रशासन जबाबदार राहील असा इशारा पारधीगुड्यातील नागरिकांनी दिला आहे. पत्रकार परिषदेला कैलास देवगडे, विजय नन्नावरे, भालचंद्र शेरकुरे, नंदकिशोर देवगडे, विलास शेरकुरे, अनिल वामन देवगडे, भीमा शेरकुरे, मनीषा देवगडे, चंदा देवगडेसह महिला, पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.





Post a Comment

0 Comments