बनावट कागदपत्र, स्वाक्षरीच्या आधारे हडपले घर

 










बनावट कागदपत्र, स्वाक्षरीच्या आधारे हडपले घर

◾न्याय मिळवून देण्याची रामील्ला कोंडय्या यांची पत्रपरिषदेत मागणी

चंद्रपूर ( राज्य रिपोर्टर ) : भाड्याने करार तत्त्वावर दिलेले घर बनावट कागदपत्र आणि स्वाक्षरीच्या आधारे भाडेकरूने परस्पर हडपल्याचा आरोप रामील्ला बुचय्या कोंडय्या यांनी गुरुवारी चंद्रपूर श्रमिक पत्रकार परिषदेत केला आहे. घर हडपणारे विक्कीराज सूर्यप्रकाश वानखेडे आणि प्रिया खाडे या दोघांवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी रामील्ला कोंडया यांनी केली आहे. या दोघांविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.

रामील्ला कोंडय्या हे वेकोलितील सेवानिवृत्त कर्मचारी आहेत. त्यांचे बायपास मार्गावरील मूकबधिर विद्यालयाजवळ दोन खोल्यांचे घर आहे. हे घर विक्कीराज सूर्यप्रकाश वानखेडे यांनी कोंडय्या यांच्याकडून दोन हजार रुपये मासिक भाड्याने भाडेतत्वावर घेतले. तसा भाडेकरारही या दोघांत झाला. परंतु, नंतर रामील्ला कोंडय्या यांना अंधारात ठेवून वानखेडे यांनी प्रिया खाडे यांच्याशी सगनमत करून हे बनावट नोटरीच्या आधारे हडपले आहे. विशेष म्हणजे या घरासाठी महावितरणनेही डोळे झाकून प्रिया खाडे यांच्या नावाने वीजमीटर दिले आहे. हा प्रकार लक्षात येताच रामील्ला कोंडय्या यांनी वानखेडे यांना जाब विचारला असता त्यांनी धारदार शस्त्राने हल्ला करून जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याचे कोंडय्या यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. दरम्यान, वानखेडे याच्याविरोधात शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून, कलम ३२४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परंतु, घर परत मिळवून देण्याबाबत पोलीस प्रशाासन, मनपा प्रशासन कोणतीही कारवाई करीत नसल्याचा आरोप रामील्ला यांनी केला आहे.

वानखेडे आणि प्रिया खाडे या दोघांवर कठोर कारवाई करून माझे घर परत मिळवून द्यावे, अशी मागणी रामील्ला कोंडय्या यांनी चंद्रपूर श्रमिक पत्रकार भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत केली आहे.




Post a Comment

0 Comments