भरधाव वाहनाच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू

 





भरधाव वाहनाच्या  धडकेत बिबट्याचा मृत्यू

चंद्रपूर  ( राज्य रिपोर्टर )  : शुक्रवार ७ एप्रिल रोजी सकाळी ८:३० वाजता दरम्यान भरधाव वाहनाच्या धडकेत झरण (कोठारी) जवळ बिबट मृत झाल्याची  घटना घडल्याने वनविभागात एकच खळबळ उडाली. त्यामुळे पुन्हा एक बिबट्याची संख्या  जिल्ह्यात कमी झाली आहे.

कन्हारगाव अभयारण्याच्या मध्य भागातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरील कोठारीपासून सहा किलोमीटर अंतरावर झरण गावाजवळ महामार्ग ओलांडताना वाहनाची धडक बसल्याने बिबट गंभीर जखमी झाला. हे वाहन लोहखनिज वाहतूक करणारे असल्याचे प्रत्यक्षदर्शीचे म्हणणे आहे. घटनेची माहिती वनविकास महामंडळाचे वनाधिकारी सुधाकर राठोड यांना समजताच    वनकर्मचाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. जखमी बिबट्यास तत्काळ चंद्रपूर येथील व्याघ्र उपचार केंद्रात नेत असता वाटेतच त्याचा मृत्यू झाला.

बल्लारपूर - आष्टी राष्ट्रीय महामार्गावर सुरजागड लोहखनिजाची वाहतूक वाढलेली असल्याने दैनंदिन अपघात सतत्याने घडत आहेत. अभयारण्याच्या अंतर्गत महामार्गाने वाहतुकीची वर्दळ आणि अनियंत्रित वाहनामुळे मानवासह वन्यजीवांना धोका निर्माण झाला आहे. 

या मार्गावर यापूर्वीही हरीण, चितळ, अस्वल, रानडुक्कर आदि प्राण्यांचा अपघाताने मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत. परंतु अशातच वाघ व इतर वन्यजीवांच्या मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. तसेच दुचाकी, चारचाकी आदींचे अपघात नित्याची बाब बनली आहे. पुढील तपास वनविभाग करीत आहे.



Post a Comment

0 Comments