शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टरसह दोन परिचारिकांवर कारवाई करा

 





शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टरसह दोन परिचारिकांवर कारवाई करा

◾शिवसेना तालुकाप्रमुख संतोष पारखी यांची मागणी


चंद्रपूर ( राज्य रिपोर्टर ) : गंभीर आजारी असलेल्या महिलेला वॉर्ड ११ मधून वार्ड ३ मध्ये घेण्यास ड्युटीवर असलेले वैद्यकीय अधिकारी आणि परिचारिकांनी मज्जाव करून जीवितास धोका निर्माण करणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यासह वॉर्ड क्रमांक तीनमध्ये उपस्थित असलेल्या परिचारिकांवर कारवाई करण्याची मागणी शिवसेना तालुका प्रमुख संतोष पारखी यांनी चंद्रपूर श्रमिक पत्रकार भवनात आयोजित पत्रकार परिषदेत केली. दरम्यान, संबंधित डॉक्टर आणि परिचारिकांविरोधात अधीष्ठाता यांच्याकडेही तक्रार करण्यात आल्याचे पारखी यांनी सांगितले.

ऊर्जानगर येथील लीलाबाई पारखी यांना २४ मार्चरोजी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात भरती करण्यात आले होते. त्यांना अपघात विभागातून वॉर्ड ११ मध्ये उपचारासाठी ठेवण्यात आले. पंरतु, प्रकृती गंभीर असल्याने वॉर्ड ११ मधील डॉक्टरांनी लीलाबाई यांना वॉर्ड ३ मध्ये रेफर केले. यावेळी वॉर्डबायने रुग्णमहिलेला स्ट्रेचरवरून वॉर्ड ३ मध्ये नेले. परंतु, वॉर्ड ३ च्या डॉक्टरने व परिचारिकांना लीलाबाईला वॉर्ड३ मध्ये भरती करून घेण्यास मज्जाव केला. तब्बल तासभर महिलेला स्ट्रेचरवर ताटकळत ठेवण्यात आले. रुग्णालयाच्या वॉर्डबायची विनंतीही धुडकावण्यात आली. अखेरीस निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. जीवने आणि जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. रामटेके यांना फोनवरून रुग्णाची माहिती देण्यात आली. यानंतर सदर महिलेला वॉर्ड ३मध्ये भरती करून घेण्यात आले. परंतु, काळात महिलेच्या जीवितास धोका निर्माण झाला असता तर जबाबदारी कोणाची असा प्रश्न करीत कर्तव्यात कुचराई आणि निष्काळतीपणा करणाऱ्या वॉर्ड ३ मध्ये उपस्थित असलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यासह दोन परिचारिकांवर कारवाईची मागणी पारखी यांनी केली आहे. याबाबतची तक्रार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आरोग्यमंत्री तानाजी सावंत, पालकमंत्री मुनगंटीवार, अधीष्ठात नितनवरे यांच्याकडे करण्यात आली असून, कारवाई न झाल्यास शिवसेना स्टाइलने आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.



Post a Comment

0 Comments