21 दिवसांच्या आतच जन्म – मृत्युची नोंदणी करा : सीईओ जॉन्सन

 





21 दिवसांच्या आतच जन्म – मृत्युची नोंदणी करा : सीईओ जॉन्सन 

 सीएसआर पोर्टलवर करू शकता ऑनलाईन नोंदणी


चंद्रपूर( राज्य रिपोर्टर ) : मृत्यु हा मानवी जीवनातील अविभाज्य भाग आहे. जीवन जगत असतांना आणि मृत्युनंतरही शासकीय तसेच इतर अनेक ठिकाणी जन्म – मृत्यु प्रमाणपत्राची आवश्यकता भासत असते. ज्या ठिकाणी जन्म किंवा मृत्यु होतो त्या कार्यक्षेत्रातील स्थानिक स्वराज्य संस्थेतच नोंदणी करणे बंधनकारक आहे. तसेच ती वेळेतही होणे गरजेचे असून नागरिकांनी 21 दिवसांच्या आत जन्म – मृत्युची नोंदणी करावी, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन यांनी केले.

जन्म – मृत्यु जिल्हास्तरीय समन्वय समितीची बैठक जिल्हाधिकारी विनय गौडा यांच्या मार्गदर्शनात तसेच  मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. बैठकीला जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजकुमार गहलोत, जिल्हा निबंधक (जन्म – मृत्यु नोंदणी विभाग) व इतर अधिकारी उपस्थित होते.

जन्म – मृत्यु नोंदणीबाबत नागरिक अनभिज्ञ असतात, असे सांगून श्री. जॉन्सन म्हणाले, सदर प्रमाणपत्र नसल्यामुळे अनेक ठिकाणी नागरिकांना समस्यांचा सामना करावा लागतो. त्यामुळे जन्म –मृत्युची नोंदणी अत्यंत आवश्यक बाब आहे. नोंद झाली नाही तर पुराव्यासाठी नातेवाईकांना न्यायालयाचा दरवाजा ठोठावावा लागतो. या प्रक्रियेत वेळ तर लागतोच आणि पैसासुध्दा खर्च होतो. 21 दिवसांच्या आत जन्म – मृत्युची नोंदणी केल्यास प्राधिकृत अधिकारी कोणतेही शुल्क आकारत नाही, असेही त्यांनी सांगितले.

केंद्र शासनाने 2016 पासून जन्म – मृत्युची नोंदणी सीएसआर पोर्टलवर ऑनलाईन करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. ग्रामपंचायत क्षेत्रात ग्रामसेवक, प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी, नगर पालिका क्षेत्रात मुख्याधिकारी, सामान्य रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक, महानगर पालिका क्षेत्रात आरोग्य अधिकारी या सर्वांमार्फत नोंदणी करण्यात येत असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गहलोत यांनी सांगितले.

घरी प्रसुती झाली असली तरी जन्म झालेल्या बाळाची नोंद आशा, अंगणवाडी सेविका यांच्याकडे करावी. त्यामुळे 21 दिवसांच्या आतच सदर नोंदणी सीएसआर पोर्टलवर ऑनलाईन करावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.




Post a Comment

0 Comments