चंद्रपूरच्‍या वनअकादमीसाठी ४ कोटी ९१ लक्ष रू. निधी मंजूर व वितरीत.

 





चंद्रपूरच्‍या वनअकादमीसाठी ४ कोटी ९१ लक्ष रू. निधी मंजूर व वितरीत.

🔸माजी अर्थ व वनमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांच्‍या प्रयत्‍नांचे फलीत. 

 चंद्रपूर ( राज्य रिपोर्टर ) : माजी अर्थ तथा वनमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांच्‍या संकल्‍पनेतुन साकारलेल्‍या चंद्रपूरातील वन प्रशासन, विकास व व्‍यवस्‍थापन अकादमी अर्थात वन अकादमीसाठी ४ कोटी ९१ लक्ष रू. निधी मंजूर करण्‍यात आला आहे. विधीमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख तथा माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांच्‍या पुढाकाराने हा निधी मंजूर झाला असून दिनांक ३० मार्च २०२२ रोजीच्‍या महसुल व वनविभागाच्‍या शासन निर्णयानुसार हा निधी वितरीत सुध्‍दा करण्‍यात आलेला आहे.

वनअकादमी चंद्रपूरसाठी सहाय्यक अनुदाने या शिर्षाखाली एकूण रू.४ कोटी ९१ लक्ष मंजूर व वितरीत करण्‍यात आला आहे. आ. सुधीर मुनगंटीवार यांच्‍या वनमंत्री पदाच्‍या कार्यकाळात दिनांक ४ डिसेंबर २०१४ रोजी चंद्रपूर वनअकादमीच्‍या निर्मीतीबाबत शासन निर्णय निर्गमित करण्‍यात आला. उत्तर भारतामध्ये डेहरादूनला ज्या पद्धतीची आयएएस झालेल्या उमेदवारांसाठी प्रशिक्षणाची सोय व सुविधा आहे, त्याच पद्धतीची वन कर्मचा-यांसाठी सोयी व सुविधा असणारी प्रशिक्षण संस्था चंद्रपूर मध्ये उपलब्‍ध होती. चंद्रपूर येथील वन प्रशिक्षण संस्थेचे वन अकादमीमध्ये रूपांतर करण्याचा निर्णय ४ डिसेंबर २०१४ ला झाला. सदर संस्थेचे नामकरण चंद्रपूर वन प्रशासन, विकास व व्यवस्थापन प्रबोधिनी करण्‍यात आले. वन प्रशिक्षण संस्था, चंद्रपूर या प्रशिक्षण संस्थेचा दर्जा वाढवून राज्य वन अकादमीमध्ये रूपांतर करण्यात आले. ही संस्था वन विभागाची वन्यजीव व्यवस्थापन, उत्पादन व वनांवर अवलंबून असणारी संस्था म्हणून काम करत आहे. वन अकादमी संकुल परिसरात वन वणवा व नैसर्गिक आपत्ती निवारण केंद्राची निर्मिती सुध्दा करण्यात आली आहे. यामुळे चंद्रपूर वन अकादमी आपत्ती निवारणाच्या प्रक्रियेतील महत्वपूर्ण केंद्र म्हणून मान्यता प्राप्त ठरले आहे. वन अकादमीची इमारत देशातील दुस-या क्रमांकाची सर्वोत्तम इमारत ठरली आहे. या अकादमीमध्ये दीर्घकालीन व्यावसायिक प्रशिक्षणासमवेतच विविध विकास प्रकल्पांचा पर्यावरणीय अभ्यास अहवाल तयार करुन देण्याची प्रक्रिया चालु आहे. पर्यावरण क्षेत्रात संस्थांसाठी प्रशिक्षण कार्यक्रम राबविणे व जनजागृतीचे उपक्रम हाती घेणे, तसेच वनखात्याची शिखर संस्था म्हणून ही अकादमी काम करत आहे. यामध्ये तांत्रिक तसेच सेवांतर्गत प्रशिक्षण देण्यात येत आहे.

वन अधिकारी आणि कर्मचा-यांच्या प्रशिक्षणासाठी डेहरादूनच्या आयएएस अकॅडमीच्या धर्तीवर ही अत्याधुनिक चंद्रपूर वन प्रशासन, विकास व व्यवस्थापन प्रबोधीनी अर्थात वन अकादमीची निर्मिती हे आ. सुधीर मुनगंटीवार यांच्‍या प्रयत्नांचे फलीत आहे. वन प्रशिक्षण संस्थेचा दर्जा वाढवून राज्य वन अकादमीत परावर्तीत करण्यात आली. वन विभागाची वन्यजीव व्यवस्थापन, उत्पादन व वनांवर कार्य करण्यासोबतच, वन वणवा आणि नैसर्गिक आपत्ती निवारण केंद्रासह सर्व सुविधांनी सुसज्ज आहे. देशातील या अत्‍याधुनिक वनअकादमीसाठी ४ कोटी ९१ लक्ष रू. निधी मंजूर व वितरीत करवून आ. सुधीर मुनगंटीवार यांनी वनअकादमीच्‍या प्रगती व विकासाला गती दिली आहे.




Post a Comment

0 Comments