नागपूरच्या दीक्षाभूमीवरील महामानवाचा पुतळा देतोय ५९ वर्षांपासून ऊर्जा व प्रेरणा

 






नागपूरच्या दीक्षाभूमीवरील महामानवाचा पुतळा देतोय ५९ वर्षांपासून ऊर्जा व प्रेरणा 

◾नागपुरातील लष्करीबागेत घडला विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा पहिला पुतळा ५९

नागपूर ( राज्य रिपोर्टर ) : वंचितांच्या उत्थानाचा सम्यक मार्ग दाखविणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा एक देखणा पुतळा दीक्षाभूमीवर उभारण्याचे ठरले. पुतळा बाबासाहेबांचा होता त्यामुळे दर्जाशी तडजोडीचा प्रश्नच नव्हता या प्रज्ञावंतांच्या विद्वत्तेचे तेज पुतळ्याच्या सर्वांगातून झळकणे अपेक्षित होते. मूर्तिकाराची शोधाशोध सुरू झाली आणि अखेर लष्करी बागेत शिल्पकार संतोष मोतीराव पराये यांचे नाव समोर आले. संतोष यांनीही बाबासाहेबांच्या आयुष्याइतक्याच कठोर साधनेने त्यांचा पुतळा साकारला. तोच पुतळा मागच्या ५९ वर्षांपासून बाबासाहेबांच्या कोट्यवधी अनुयायांना सामाजिक प्रतिक्रांतीची अविरत प्रेरणा देतोय. आज दीक्षाभूमीवर जगभरातून लोक येतात आणि प्रज्ञासूर्याच्या याच पुतळ्यासमोर नतमस्तक होतात. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणानंतर कर्मवीर बाबू हरिदास आवळे यांच्या अथक परिश्रमातून १३ एप्रिल १९५७ रोजी दीक्षाभूमीवर पहिली तथागत गौतम बुद्ध यांची मूर्ती स्थापन झाली. याच ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा उभारला जावा, याची हुरहुरही बाबू हरिदास आवळे यांना लागली होती. त्यांनी कमाल चौक, रामटेके बिल्डिंग राहाटे टेलर्स येथील रिपब्लिकन पार्टी कार्यालयात कार्यकर्त्यांची बैठक बोलाविली. बाबासाहेबांचा चांगला पुतळा बनविणारा कुणी आहे का, असा प्रश्न विचारला. यावेळी उपस्थितांनी वेगवेगळी नावे सुचविली. त्यातील काहींनी चितार ओळीतील संतोष मोतीराव पराये यांचे नाव सांगितले. बाबू आवळे आपल्या काही कार्यकर्त्यांसह पराये यांच्याकडे गेले आणि त्यांना बाबासाहेबांच्या पुतळ्याची ऑर्डर दिली.

लष्करीबागेतील हाडके भवनात पुतळ्याची निर्मिती

बाबासाहेब यांचा पुतळा बनविण्यासाठी लष्करीबागेतील 'हाडके भवन' येथील जागेची निवड करण्यात आली. पराये यांना जेव्हा वेळ मिळत असे तेव्हा ते बाबासाहेबांचा पुतळा बनवू लागले. बाबासाहेबांचा पुतळा बनण्यास सुरुवात झाली तेव्हा अनुयायांची गर्दी व्हायची. पुतळा जेव्हा पूर्णत्वास आला तेव्हा लोकांच्या झुंडीच्या झुंडी हाडके भवनाकडे धाव घेत होत्या. पुतळ्याला सिमेंट लावलेले पाहून मूर्तिकार ढसाढसा रडले पुतळ्याला पाहण्यासाठी येणाऱ्यांमध्ये काही कार्यकर्ते म्हणायचे बाबासाहेबांचा गाल मोठा वाटतो. काही म्हणायचे कान मोठे वाटतात. धोंडबाजी मेढे गुरुजी (कारागीर) यांनी बाबासाहेबांच्या गालाला सिमेंट लावले. अर्ध्या-पाऊण तासाने मूर्तिकार पराये आले. गालाला सिमेंट माखलेले पाहून ते फारच नाराज झाले आणि ढसाढसा रडू लागले. तेथे उपस्थित बाबू आवळे यांनी त्यांची माफी मागितली. पराये यांनी बाबूंच्या शब्दाला मान देऊन पुनश्च नव्या जोमाने पुतळा बनविण्यास लागले. पॉलिश कागदाने पुतळ्याच्या गालाला लागलेले सिमेंटचे कण न् कण मोठ्या परिश्रमपूर्वक पुसून काढले.

लष्करीबागेतून पुतळ्याची विशाल मिरवणूक निघाली

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी, ६ डिसेंबर १९६३ रोजी पुतळ्याचा अनावरणाचा दिवस ठरला. दुपारी २ वाजता बाबासाहेबांच्या साडेपाच फूट उंचीच्या भव्य व आकर्षक अर्धपुतळ्याची विशाल मिरवणूक लष्करीबागेतून कर्मवीर दादासाहेब गायकवाड व रावबहादूर एन. शिवराज यांच्या उपस्थितीत बाबू आवळे यांच्या नेतृत्वात निघाली. सायंकाळी मेणबत्तीच्या प्रकाशात दीक्षाभूमीवर मिरवणूक पोहोचली. बाबासाहेबांच्या पुतळ्याला अभिवादन करण्याकरिता लाखो अनुयायी आले होते. दोन फूट उंचीच्या चबुतऱ्यावर बाबासाहेबांचा पुतळा क्रेनच्या सहाय्याने बसविण्यात आला. त्यानंतर रावबहादूर एन. शिवराज यांनी विजेचे बटन दाबून पुतळ्याचे अनावरण केले. त्याचक्षणी उपस्थित असलेल्या जवळपास दोन लाख अनुयायांनी बाबसाहेबांचा जयघोष करीत अभिवादन केले. या पुतळ्याला ५९ वर्षे झाली.



Post a Comment

0 Comments