ट्रक व क्रुझर चा भीषण अपघात : 7 ठार 10 जखमी असल्याचे वृत्त

 



ट्रक व क्रुझर चा भीषण अपघात : 7 ठार 10 जखमी 

◾लातूर-अंबाजोगाई महामार्गावर नांदगाव फाट्याजवळ नंदगोपाल डेअरी नजीक

वृत्तसेवा ( राज्य रिपोर्टर ) : लातूर-अंबाजोगाई महामार्गावर नांदगाव फाट्याजवळ नंदगोपाल डेअरी नजीक शनिवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास ट्रक आणि क्रुझरचा भीषण अपघात झाला. या अपघातात सात जण ठार तर १० जण जखमी झाले आहेत. जखमीपैकी तिघांची प्रकृती चिंताजनक आहे. अरुंद महामार्गामुळे बर्दापूर ते अंबासाखर टप्प्यात अपघातांचे प्रमाण प्रचंड वाढले असून प्रवाशांचे नाहक बळी जात आहेत.

अंबाजोगाई तालुक्यातील राडी येथे आज मावंद्याचा कार्यक्रम होता. या कार्यक्रमासाठी लातूर जिल्ह्यातील साई आणि आर्वी येथून नातेवाईक क्रुझर गाडीतून निघाले होते. ते बर्दापूरच्या पुढे नंदगोपाल डेअरीजवळ आले असता त्यांच्या क्रुझरला समोरून येणाऱ्या ट्रकने जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात क्रुझरमधील सात जण ठार झाले तर १० जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये निर्मला सोमवंशी ( ३८ ), स्वाती बोडके ( ३५ ), शकुंतला सोमवंशी ( ३८ ), सोजरबाई कदम ( ३७ ), चित्रा शिंदे ( ३५ ), खंडू रोहिले ( ३५, चालक ) आणि अनोळखी एकाचा समावेश आहे. तर, राजमती सोमवंशी ( ५० ), सोनाली सोमवंशी ( २५ ), रंजना माने ( ३५ ), परिमला सोमवंशी ( ७० ), दत्तात्रय पवार ( ४० ), शिवाजी पवार ( ४५ ), यश बोडके ( ९ ), श्रुतिका पवार ( ६ ), गुलाबराव सोमवंशी ( ५० ) आणि कमल जाधव ( ३० ) हे दहा जण जखमी झाले आहेत. जखमीपैकी तिघांची प्रकृती चिंताजनक आहे. मृतात महिला आणि बालकांचा समावेश आहे. अपघाताची माहिती मिळताच पालकमंत्री धनंजय मुंडे यांचे स्वीय सहाय्यक खंडू गोरे, रणजीत लोमटे, तानाजी देशमुख यांनी रूग्णालयात धाव घेतली. पालकमंत्री धनंजय मुंडे मोबाईलवरून संपर्कात राहून सातत्याने अपडेट घेत होते. दरम्यान, अंबाजोगाईच्या अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर, उपविभागीय अधिकारी शरद झाडके, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील जायभाये यांनी रुग्णालयात भेट देऊन जखमींची विचारपूस केली.

Post a Comment

0 Comments