राज्याच्या अर्थसंकल्पातून सर्वच घटकांची घोर निराशा - हंसराज अहीर

 



राज्याच्या अर्थसंकल्पातून सर्वच घटकांची घोर निराशा - हंसराज अहीर


चंद्रपूर ( राज्य रिपोर्टर ) : राज्यातील महाविकास आघाडी सरकारने सादर केलेला अर्थसंकल्प हा पंचसुत्रीवर आधारलेला असल्याचे अर्थमंत्री यांनी सांगीतले असले तरी या अर्थसंकल्पात केवळ आकड्यांचा खेळ केला गेला आहे. त्यामुळे विकासाचा आभास दर्शविणाऱ्या या अर्थसंकल्पाने सर्वांचीच घोर निराशा केली असल्याची प्रतिक्रिया पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी व्यक्त केली आहे.

सरकारने अनेक योजनांसाठी कोट्यवधीची उड्डाणे केली असली तरी यापूर्वीच्या अर्थसंकल्पातून केलेल्या घोषणांची परीपूर्ती करण्यास सरकारला दारुण अपयश आल्याने हे सरकार केंद्राच्या बजेट निधीतून अधिकाधिक विकास करण्याचा खटाटोप करणारे आहे. त्यामुळे अर्थमंत्र्यांनी सादर केलेलया या तिसऱ्या  अर्थसंकल्पावर महाविकास आघाडी सरकार अंमल करेल याची सुतराम शक्यता नाही. हा अर्थसंकल्प घोषणाबाजीचा केवळ नमुनाच ठरेल असेही अहीर यांनी म्हटले आहे. या अर्थसंकल्पात शेतकरी हिताचे, कष्टकऱ्यांच्या न्यायाचे, महिला सुरक्षेचे सर्वसामान्यांना दिलासा देण्याचे कोणतेही धोरण दिसत नसल्याने हा अर्थसंकल्प केवळ पोकळ वल्गना करणारा ठरेल असेही अहीर यांनी म्हटले आहे.

Post a Comment

0 Comments