परिचारिका या आरोग्य विभागाचा कणा खासदार बाळू धानोरकर : भावी परिचारिकांच्या शपथविधी सोहळा

 



परिचारिका या आरोग्य विभागाचा कणा  खासदार बाळू धानोरकर : भावी परिचारिकांच्या शपथविधी सोहळा

चंद्रपूर ( राज्य रिपोर्टर ) : स्वतःच्या आयुष्यातला काळोख विसरून रुग्णांच्या जीवनात आनंदाचा दिवा प्रज्वलित करण्यासाठी धडपड करणाऱ्या रुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा म्हणून रुग्णाची अहोरात्र सेवा करणाऱ्या परिचारिका ह्या खऱ्या अर्थाने आरोग्य विभागाचा कणा आहे. कोरोना काळात अगदी पहिल्या दिवसापासून डॉक्टरांसोबत परिचारिका देखील चोखपणे आपलं कर्तव्य बजावत होते. हे देखील आपण विसरू शकणार नसल्याचे प्रतिपादन खासदार बाळू धानोरकर यांनी केले आहे. 

                            ते सेंट पॉल नर्सिंग कॉलेज बामनी येथे जी. एन. एम प्रथम वर्ष विद्यार्थ्यांच्या  शपथविधी सोहळ्याप्रसंगी बोलत होते. 

याप्रसंगी काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष रामू तिवारी, महाराष्ट्र प्रदेश महासचिव विनोद दत्तात्रय, माजी नगराध्यक्ष घनश्याम मुलचंदानी, काँग्रेस नेते करीम भाई, प्रकाश पाटील मारकवार, संस्थेचे संचालक अविनाश खैरे, सेंट पॉल स्कूल बामणी संचालिका नीना खैरे, प्राचार्य रामा कांबळे, यांची उपस्थिती होती.  

पुढे बोलताना खासदार बाळू धानोरकर म्हणाले कि, बदलत्या काळानुसार गेल्या काही वर्षात सामाजिक व कौटुंबिक बदलामुळे तसेच आजाराचे बदलते स्वरूप व वाढती लोकसंख्या यामुळे रुग्णालयांची व त्याचबरोबर परिचारिकांची गरज फार मोठ्या प्रमाणावर भासू लागली आहे .परिचारिकांची संख्या ही त्यांच्या मागणी पेक्षा खूपच कमी आहे. आज आपण जर महाराष्ट्राचा विचार केला तर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सार्वजनिक आरोग्य विभाग व महानगर पालिकेचे रुग्णालय येथील रुग्णसेवेचा डोलारा हा अतिशय अल्प प्रमाणात असलेल्या परिचारिकांच्या खांद्यावर आहे. त्यामुळे सद्यपरिस्थितीत कामावर असणाऱ्या परिचारिका वर त्याचा ताण पडत आहे. यासाठी पाठपुरावा करून पदभरती करण्याची मागणी करणार असल्याचे खासदार बाळू धानोरकर यांनी याप्रसंगी सांगितले.

Post a Comment

0 Comments