मनपा निवडणुकीत संयुक्त ‘रिपाइं‘चा महापौर होणार-प्रा. जोगेंद्र कवाडे

 




मनपा निवडणुकीत संयुक्त ‘रिपाइं‘चा महापौर होणार-प्रा. जोगेंद्र कवाडे    

◾उपेक्षित वर्ग एकत्र आल्याने एकजुटीला मिळाले बळ-प्रा. जोगेंद्र कवाडे 

नागपूर ( राज्य रिपोर्टर ) :  गेल्या 21 वर्षांपासून लोकसभा व विधानसभा निवडणुकीमध्ये काॅंग्रेस व राष्ट्रवादी काॅंग्रेससोबत एक घटक पक्ष म्हणून पीपल्स रिपब्लिकन पार्टी नेहमी त्यांच्यासोबत खंबीरपणे उभा राहिला आहे. परंतु, स्थानिक स्वराज्य निवडणुकीत प्रस्थापित पक्ष मानल्या जाणाऱ्या काॅंग्रेस व राकाॅंपाने नेहमीच घटक पक्ष मानल्या जाणाऱ्या रिपब्लिकन पक्षाची उपेक्षा केली. त्यामुळे राज्यात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकांमध्ये रिपब्लिकन पक्षाचे विविध गटांसोबत ओबीसी व आदिवासी बांधवांच्या विविध संघटांनी एकत्रितपणे संयुक्त रिपब्लिकन आघाडीच्या बॅनरखाली स्वबळावर निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. आगामी मनपा निवडणूकीत संयुक्त रिपब्लिकन आघाडी पूर्ण ताकतीने आपल्या एकजुटीचा परिचय देत आपला महापौर बनविणार असल्याचे मत लॉंगमार्च प्रणेता, पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तसेच माजी खासदार. प्रा. जोगेंद्र कवाडे सर यांनी केले. बुधवारी नागपूर येथील रविभवन कॉन्फरन्स हॉलमध्ये पीपल्स रिपब्लिकन पार्टी, महाराष्ट्र प्रदेश तसेच विदर्भ पदाधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीनंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. या पत्रपरिषदेमध्ये पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जयदीप कवाडे, महाराष्ट्र प्रदेश संघटक कपिल लिंगायत, पीआरपी नागपूर शहर अध्यक्ष कैलास बोंबले, युवक आघाडी अध्यक्ष सोहेल खान, जेष्ठ नेते (कामगार नेते) बाळूमामा कोसमकर, शहर सचिव अजय चव्हाण, उपाध्यक्ष प्रकाश मेश्राम, रोशन तेलरांध्ये, विपीन गडगीलवार यांची उपस्थिती होती.
  • नागपुरात ७५ जागांवर विजय निश्चित
संयुक्त रिप. आघाडीमध्ये मुस्लीम समाज, आदिवासी विकास परिषद, गोंडवाना गंणतंत्र पार्टी, ओबीसींच्या संघटना प्रतिसाद देत आहेत. त्या बळावर रिप. आघाडी ७५ जागांवर विजय होणार आहे. रिप. पक्षांच्या दुसऱ्या फळीतील नेत्यांनी मंत्री रामदास आठवले, डॉ. राजेंद्र गवई यांच्याशी चर्चा केली आहे. लवकर इंदोरा येथील मैदानावर संयुक्त रिपब्लिकन आघाडीच्या नेत्यांची सभा होणार आहे. मनपा निवडणूक कधीही झाली तरी संयुक्त रिप. आघाडी एकसंघ राहणार असल्याचेही प्रा. जोगेंद्र कवाडे सर यांनी सांगितले. प्रकाश आंबेडकर संयुक्त रिपब्लिकन आघाडीत का सहभागी नाहीत असेही त्यांनी यावेळी स्पश्ट केले.
  • 'संयुक्त रिपाआ'चा नागपूर, अमरावती, अकोला, नवी मुंबई, ठाण्यात झेंडा फडकणार
संयुक्त रिपब्लिकन आघाडीबाबत माहिती पत्रकारांना देताना प्रा. जोगेंद्र कवाडे सर म्हणाले की, आतापर्यंत अनेकदा रिपाइं गटातील विविध पक्षांसोबत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूकीत काॅंग्रेस व राकाॅंपाने दुजाभाव केला. आता दोन्ही पक्षांनी शिवसेनेसोबत महाविकास आघाडी स्थापित करून महाराश्ट्रात सरकार स्थापन केली आहे. परंतु, आघाडीत आता 3 पक्ष आल्याने घटक पक्षांसोबत अधिक दुजाभाव होण्याचे संकेत अधिक आहे. वारंवार होणारी उपेक्षा लक्षात घेऊनच संयुक्त रिपब्लिकन आघाडीची स्थापना नागपूर, अमरावती, अकोला, नवी मुंबई, ठाणेसह इतर ठिकाणी करण्यात आली आहे. या आघाडीमध्ये असेलेले सर्वच गटांनी एकजुटीने निवडणुक लढून रिपाइंचा झेंडा फडकवून महापौर रिपाइंचा बनविण्याचा प्रयत्न सुरू केले आहे. या प्रयोगाने उपेक्षित समाज मानल्या जाणारा वर्ग सत्तेत येणार असल्याचेही प्रा. कवाडे सर यावेळी म्हणाले.
  • महाराष्ट्रात फक्त मुंबईवर प्रेम का ?
पीपल्स रिपब्लिकन पार्टीची नेहमीच एक वार्ड एक नगरसेवक अषी भूमिका राहिली आहे. मात्र, राज्यात विविध ठिकाणी प्रभाग पद्धतीद्वारे 4 किंवा 3 नगरसेवकांचा प्रभाग रचना तयार करण्यात आले आहे. परंतु, राजधानी असलेल्या मुंबईतच एक वार्ड एक नगरसेवक पद्धती लागू करून अधिक प्रेम दाखविल्या गेले. महाराष्ट्रात इतरही शहर आहेत, तेथेही एक वार्ड एक नगरसेवक प्रमाणे रचना करण्याचा सल्लाही प्रा. जोगेंद्र कवाडे सर यांनी केला. देशात इंधन दरवाढ नेहमीचेच झाले आहे. आता महागाईचे समर्थन करणारे वेगवेगळी उत्तरे देत आहेत. परंतु, देशातील जनतेला दरवाढीचा प्रचंड त्रास पेट्रोल, डिझेलसह घरघुती गॅसमुळे होत आहे. त्यामुळे येत्या 6 एप्रिल पासून पीपल्स रिपब्लिकन पार्टी तर्फे राज्यात आंदोलन करण्यात येणार असल्याची माहितीही प्रा. जोगेंद्र कवाडे सरांनी दिली.
  • अंबाझरीत डॉ. बाबासाहेब सांस्कृतिक भवन तातडीने उभारा
अंबाझरी उद्यानात डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृती सांस्कृतिक सभागृह उद्धवस्त करण्यात आल्याने त्याबाबत तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. एमटीडीसीच्या दुर्लक्षामुळे सभागृह पाडण्यात आले. त्याविरोधात पीरिपाने मोठा मोर्चा काढला. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना निवेदन सादर करण्यात आले. लोकभावना लक्षात घेऊन हे सभागृह गरुडा अम्युझमेंट पार्कने डॉ. बाबासाहेबांच्या नावाला साजेसे सभागृह उभारण्याचा निर्णय घेतला आहे. ते सभागृह तातडीने पूर्ण होण्यासाठी पालकमंत्री डॉ. नितीन राऊत आणि युवक व क्रीडा मंत्री सुनील केदार यांनी लक्ष द्यावे, असे आवाहन प्रा. जोगेंद्र कवाडे सरांनी यावेळी केले.


Post a Comment

0 Comments