ज्येष्ठ संगीतकार - गायक बप्पी लाहिरी यांचं निधन

 



ज्येष्ठ संगीतकार - गायक   बप्पी लाहिरी यांचं निधन

मुंबई ( राज्य रिपोर्टर ) : संगीतकार - गायक बप्पी लहिरी यांचे निधन झाले आहे. ते ६९ वर्षांचे होते. त्यांनी बुधवारी सकाळी मुंबईतील रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. बप्पी लहरी यांचं खरं नाव अलोकेश लहरी होतं. त्यांचा जन्म २७ नोव्हेंबर १९५२ रोजी जलपैगुडी पश्चिम बंगालमध्ये झाला होता. त्यांनी हिंदी सिनेसृष्टीतील गाण्यांमध्ये पॉपचा तडका आणला. बप्पी यांच्या गाण्यांनी, संगीताने भारतीय संगीत विश्वाला एक वेगळी ओळख दिली आहे. १९७३ मध्ये 'नन्हा शिकारी' सिनेमात गाणं गाण्याची संधी त्यांना मिळाली होती. मात्र त्यानंतर १९७५ मध्ये 'जख्मी' या सिनेमातून त्यांना खरी प्रसिद्धी मिळाली. या सिनेमातून त्यांनी मोहम्मद रफी आणि किशोर कुमार सारख्या महान गायकांसोबत गाणं गायलं होतं. बप्पी लहरी आणि मिथुन चक्रवर्ती यांची जोडी चर्चेत राहिली. एकीकडे मिथुन यांचा डान्स तर बप्पी लहरी यांची पॉप, डिस्को गाणी असं कॉम्बिनेशन प्रेक्षकांच्या चांगलंच मनात उतरलं होतं.

बप्पी लहरी यांच्या काही हिट गाण्यांपैकी 'याद आ रहा है', 'सुपर डान्सर', 'बॉम्बे से आया मेरा दोस्त', 'ऐसे जीना भी क्या जीना है', 'प्यार चाहिए मुझे जीने के लिए', 'रात बाकी', 'यार बिना चैन कहा रे', 'उह ला ला उह लाला' ही आणि इतर बरीच गाणी आहेत. ८० आणि ९० च्या दशकातला काळ त्यांनी त्यांच्या गाण्यांनी चांगलाच गाजवला होता. हिंदीसह त्यांनी बंगाली, गुजराती, तामिळ, तेलुगू, कन्नड गाणी देखील गायली आहेत. आत्तापर्यंत त्यांनी गायन आणि संगीत क्षेत्रातील काम सुरु ठेवलं होतं. २०२० मध्ये 'बागी ३' सिनेमातील भंकस हे गाणं त्यांचं हिंदी सिनेसृष्टीतील शेवटचं गाणं ठरलं. बप्पी यांच्यावर अनेक पुरस्कारांचाही वर्षाव झाला. ६३ व्या फिल्मफेयर पुरस्कार सोहळ्यात त्यांना संगीत क्षेत्रातील कामगिरीसाठी जीवनगौरव पुरस्काराने गौरवण्यात आलं होतं.

बप्पी यांचं सोन्या प्रतीचं प्रेम तर सगळ्यांनाच माहित आहे. त्यांच्या गळ्यात कित्येक तोळ्याच्या सोन्याच्या मोठमोठ्या माळा, अंगठी असे सोन्याचे दागदागिने ते घालायचे. त्यांचा लुकही कायम रॉकस्टार सारखा असायचा. लांब केस, डोळ्यांवर चष्मा, सोन्याचे दागदागिने आणि रंगबेरंगी कपडे असा त्यांचा पेहराव कायम लक्षवेधी असायचा.

Post a Comment

0 Comments