सुधिरभाऊ मुनगंटीवार नागपूरसह जालना व बीडचे निवडणूक प्रभारी तर चंद्रपूर महानगरपालिकेचे प्रभारी चंद्रशेखर बावनकुळे

 



सुधिरभाऊ मुनगंटीवार नागपूरसह जालना व बीडचे निवडणूक प्रभारी तर चंद्रपूर महानगरपालिकेचे प्रभारी चंद्रशेखर बावनकुळे 

नागपूर ( राज्य रिपोर्टर ) : राज्यात महानगरपालिका निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. भारतीय जनता पक्षाने निवडणूक प्रभारी म्हणून काल मुंबई येथे झालेल्या कोअर कमिटीच्या बैठकीत जिल्ह्याचे प्रभारी निवडले. यामध्ये माजी ऊर्जामंत्री, भाजपचे प्रदेश सरचिटणीस आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर चंद्रपूर महानगरपालिकेचे निवडणूक प्रभारी म्हणून, तर माजी अर्थमंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्यावर नागपूर महानगरपालिकेचे निवडणूक प्रभारी म्हणून जबाबदारी पक्षाने सोपविली आहे. आमदार सुधिरभाऊ मुनगंटीवार यांच्याकडे बीड आणि जालना जिल्ह्यांच्या प्रभारीपदाचीही जबाबदारी सोपविण्यात आली आहे. हे नेते आता जबाबदारी सोपविलेल्या जिल्ह्याच्या महापालिका निवडणुकींचे मॉनिटरींग करणार आहेत. निवडणुका लढवण्याची भाजपची स्वतःची एक पद्धत आहे. त्यानुसारच या जबाबदाऱ्या वाटून देण्यात आल्या आहेत. प्रामुख्याने बूथ पातळीवरची यंत्रणा सक्रिय आहे की नाही, मेळावे, निवडणुकीचे मुद्दे, लहान मोठ्या सभांचे आयोजन, सोशल मिडीयाची आखणी या आणि इतर सर्व कामांवर हे प्रभारी लक्ष ठेवून असणार आहेत. पण मुख्य काम त्या-त्या ठिकाणचे प्रमुखच बघणार आहेत. चंद्रपूर शहर महानगरपालिका निवडणुकीच्या संदर्भात शहरप्रमुख मंगेश गुलवाडे, तर नागपूरमध्ये शहराध्यक्ष आमदार प्रवीण दटके यांच्यावरच निवडणुकीची संपूर्ण दारोमदार राहणार आहे. तिकीट वाटप, ही महत्वाची जबाबदारी या प्रमुखांवरच असणार आहे. पण जर का तिकिटे वाटताना कुठे वाद झाला, दोन नेते आमने-सामने उभे ठाकले, तर तेव्हा थर्ड पार्टी ऑडिटर म्हणून प्रभारी मध्यस्थी करून त्यावर तोडगा काढतील. एकंदरीतच निवडणुकीच्या कामावर लक्ष ठेवण्याचे काम प्रभारींचे असणार आहे. इतर वेळी आमदार मुनगंटीवार चंद्रपूर आणि आमदार बावनकुळे हे आपआपल्या शहरांतच असणार आहेत. नागपूर महानगरपालिकेच्या मागील निवडणुकीमध्ये नाना पटोले भाजपचे निवडणूक प्रभारी होते. त्यानंतर अमरावतीचे डॉ. सुनील देशमुख होते. ते कॉंग्रेसमध्ये गेल्यामुळे आता आमदार सुधीर मुनगंटीवार यांना नागपूरचे प्रभारी करण्यात आले आहे. पण आमदार बावनकुळे नागपूर विधानपरिषेदेचे सदस्य आहेत. आमचे नेते आहेत, तिकीट वाटप आणि इतर प्रक्रियेमध्ये ते नागपूरात असणारच आहेत आणि आम्हाला ते हवेच आहेत, असे भाजपचे शहराध्यक्ष आमदार प्रवीण दटके ‘प्रसारमाध्यम’शी बोलताना म्हणाले.


Post a Comment

0 Comments