८५% भाजलेल्या अडीच वर्षाच्या बालकाला डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न करून वाचविले : डॉक्टर ठरले देवदूत !

 



८५% भाजलेल्या अडीच वर्षाच्या बालकाला डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न करून वाचविले : डॉक्टर ठरले देवदूत !

पुणे ( राज्य रिपोर्टर ) : दीड महिना केलेल्या शर्थीच्या उपचाराने पंचाऐंशी टक्के भाजलेल्या अडीच वर्षांच्या चिमुकल्याला जीवदान मिळवून देण्यात डॉक्टरांना यश मिळाले आहे. नोबल हॉस्पिटलमधील विशेष बर्न्स युनिटमध्ये डॉ. अभिषेक घोष आणि डॉ. एस भंडारी यांच्या पथकाने तेरा शस्त्रक्रिया करून हे यश मिळवले आहे. स्वरांश देवकर हा अडीच वर्षाचा चिमुकला अंगावर गरम पाणी सांडल्याने पंचाऐंशी टक्के भाजला होता. त्याला सुमारे दीड महिन्यापूर्वी येथील नोबल रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. इतक्या मोठ्याप्रमाणात भाजल्याने तो वाचेल, असे वाटत नव्हते. मात्र, नोबल रुग्णालयाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. दिलीप माने, कार्यकारी संचालक डॉ. एच. के. साळे यांच्या नेतृत्वाखाली डॉ. अभिषेक घोष, डॉ. एस. भंडारी, भुलतज्ञ आणि त्यांचे पथक, परिचारीका यांच्या टिमने विचारविनिमय करून चिमुकल्या स्वरांशवर सर्वोत्तम प्रोटोकॉल प्रमाणे उपचार देण्याचे ठरवून डॉक्टरांनी तातडीने त्याच्यावर उपचार सुरू केले.

रुग्णाचे रोगनिदान खूपच खराब होते आणि जगण्याची शक्यता खूपच कमी असल्याचे दिसत होते. बाळाला अतिदक्षता विभागात दाखल करून वैद्यकीय आणि सर्जिकल थेरपीच्या स्वरूपात प्रगत उपचार सुरू करण्यात आले. सुरुवातीला बालक उपचाराला प्रतिसाद देत होता परंतु, भाजण्याचे प्रमाण जास्त असल्याने बालक सेप्सिसमध्ये गेला आणि त्याच्या जीवाला मोठा धोका निर्माण झाला. मात्र, डॉक्टरांनी कसोशीने आपले प्रयत्न सुरूच ठेवले. सुदैवाने हळूहळू बाळाची तब्येत सुधारून तो बरा होऊ लागला. दरम्यान, या चिमुकल्यावर बर्न डीब्राईडमेंट, बर्न एक्सिजन आणि स्किन ग्राफ्टिंगसह १३ शस्त्रक्रिया करण्यात आल्या. त्याची प्रकृती आता चांगली आहे. पुढील काही दिवसांत त्याला डिस्चार्ज देण्यात येईल, असे डॉ. घोष यांनी सांगितले.

"बर्न्सची इतकी उच्च टक्केवारी असलेल्या रूग्णाचे जगणे जगभरातील सर्वोत्कृष्ट बर्न युनिटमध्येही अत्यंत दुर्मिळ असते. अशा बर्न्सवर फक्त सर्व समावेशक बर्न्स सेंटरमध्ये उपचार केले जाऊ शकतात. नोबल हॉस्पिटलमध्ये एक विशेष बर्न्स युनिट आणि अनुभवी डॉक्टर आहेत. बर्न्स रुग्णांना जगभरात उपलब्ध असलेले सर्वोत्तम उपचार आम्ही स्वतंत्र व्यवस्थेद्वारे येथे उपलब्ध करून दिले आहेत.'


Post a Comment

0 Comments