स्मशानभूमी नसल्याने अंत्यसंस्काराविना तब्बल प्रेत तसेच पडून राहिल्याची धक्कादायक घटना



स्मशानभूमी नसल्याने अंत्यसंस्काराविना तब्बल प्रेत तसेच पडून राहिल्याची धक्कादायक घटना

 ◾मरणानंतरही यातना संपेना, गावात स्मशान भूमीच नसल्याने तब्बल १० तास पहावी लागली वाट : अखेर पडीक जमिनीवर करावे लागले अंत्यसंस्कार 


गोंडपीपरी ( राज्य रिपोर्टर ) : चंद्रपुरातील एका गावात स्मशानभूमी नसल्याने अंत्यसंस्काराविना तब्बल प्रेत तसेच पडून राहिल्याची धक्कादायक घटना पुढे आली आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिपरी तालुक्यातील गोजोली गावातील एका कुटुंबावर ही दुर्देवी वेळ आली. स्मशानभूमी नसल्याने कुटुंबातील सदस्याचे अंत्यसंस्कार अखेर पडीक जमिनीवर करण्यात आले. चंद्रपूर येथील गोजोली गावात स्मशानभूमीच नाही. गावातील नागरिक वनविभागाच्या एका अतिक्रमित जागेवर अंत्यविधी करत असत. मात्र ५ वर्षाआधी या जागेवर वनविभागाने वृक्षारोपण केले आणि अंत्यसंस्कार करण्याची जागाच हिरावली गेली. नंतरच्या काळात गावात मृत्यू  झाला, तर ग्रामस्थ स्वतःच्या शेतजमिनीत अंत्यसंस्कार करु लागले. तीच या गावाची प्रथा झाली.

मात्र, काल या गावातील पांडुरंग उराडे (७०) यांचा मृत्यू झाला. त्यांची शेतजमीन १० किमी दूर आडवळणाच्या भागात आहे. आता अंत्यविधी करायचा कुठे, असा प्रश्न कुटुंबियांना पडला. कुटुंबातील सदस्यांनी ग्रामपंचायत गाठली. अंत्यसंस्कार कुठे करायचे असा सवाल विचारला; मात्र प्रशासन आणि सरपंचांकडे याचे उत्तर नव्हते. पांडुरंग उराडे यांचा पहाटे ५ वाजताच्या सुमारास मृत्यू झाला. आप्तेष्टांनी १० तास सरकारी कार्यालयाचे खेटे घातले. अनेक जागा शोधल्या. मात्र अंत्यसंस्कार करण्यासाठी जागा काही मिळेना. अखेर शोधाशोध करून एक पडीक जागा शोधून कसाबसा अंत्यविधी उरकला गेला. गोजोली गावाची स्मशानभूमीची जागा अद्याप निश्चित झालेली नाही. ती भविष्यात होईल, एवढीच माहिती सरपंच देऊ शकले.

गावातील मूलभूत सुविधांमध्ये स्मशानभूमीचा समावेश असतो. गोजोली जुने गावठाण असूनही आजी-माजी लोकप्रतिनिधी ही लोकोपयोगी सुविधा उभारण्यास असफल ठरले. म्हणूनच पांडुरंग उराडे यांना जगण्याने छळले होतेच मरणाने तिष्ठत ठेवल्याचा दुर्धर प्रसंग आप्तेष्टांना बघावा लागला.


Post a Comment

0 Comments