आठवडी बाजारात भरधाव कार घुसली : एकाचा मृत्यू ४ गंभीर जखमी

 


आठवडी बाजारात भरधाव कार घुसली : एकाचा मृत्यू ४ गंभीर जखमी

◾घटना  चंद्रपूर जिल्ह्यातील सावली 

चंद्रपूर ( राज्य रिपोर्टर ) : भरधाव वेगाने जाणारी कार बाजारात घुसली. यात एकाचा मृत्यू, तर चार गंभीर जखमी झाले. ही घटना गुरुवारी ( दि . २१ ) दुपारी एक वाजताच्या सुमारास घडली. मार्कंडी शंकर मोहुर्ले ( ७० रा.खेडी ) असे मृताचे नाव आहे. दशरथ कावरु ( वय ६० रा. सिंदोळा ) सोमेश्वर डोमाजी मोहुर्ले ( वय 36 रा. कापसी ), कांताबाई बिबीशन कन्नाके ( ५३ रा. किसाननगर ) आणि छायाबाई राजू काले ( वय ५५ रा. मूल ) अशी जखमीचे नाव आहेत. गंभीर जखमी झालेल्या अपघातग्रस्तांना गडचिरोली येथील सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले. गुरुवारी सावलीत आठवडी बाजार भरतो. खेड्यापाड्यातील नागरिक खरेदी-विक्रीसाठी बाजारात येतात. बाजार सुरू असतानाच  MH 34 A 0375  क्रमांकाची मारुती कार सिंदोळा मार्गावरून सावलीकडे येत होती. 


प्रत्यक्षदर्शीच्या सांगण्यावरून कार भरधाव वेगाने होते. आठवडी बाजाराजवळच चालकाचे नियंत्रण सुटले. त्याने फळांच्या रिक्षाला धडक देऊन पाच नागरिकांना चिरडले. पाचही जखमींना सावली येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान खेडी येथील मार्कंडी शंकर मोहुर्ले याचा मृत्यू झाला. दशरथ कावरू, सोमेश्वर डोमाजी मोहुर्ले हे गंभीर जखमी झाले, तर कांताबाई कन्नाके, छायाबाई राजू काले यांना किरकोळ मार लागला. जखमींना पुढील उपचाराकरिता गडचिरोली येथील सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले. वृत्तलिहेपर्यंत चालकास अटक झालेली नव्हती. पुढील तपास सावलीचे ठाणेदार शिरसाट यांच्या मार्गदर्शनात सहायक फौजदार बोधे, लाटकर, वाहतूक विभागाचे सहायक फौजदार बोल्लीवार, वाहतूक शिपाई विशाल दुर्योधन करीत आहेत. सावली हे तालुक्याचे मुख्यालय आहे. ग्रामीण भागातील नागरिक आठवडी बाजाराकरिता येतात. आठवडी बाजार सावली - हरांबा मार्गावर भरतो. आठवडी बाजाराच्या दिवशी प्रचंड गर्दी होत असल्याने प्रवाशांना तसेच बाजार करण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. परिणामी लहान-मोठे अपघातसुद्धा होत आहेत. आठवडी बाजार नियोजित जागेवरच बाजार भरविण्यात यावा, अशी मागणी कित्येकदा करण्यात आली. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे.

Post a Comment

0 Comments