बल्लारपूर तालुक्यात पोळा व तान्हा पोळा साध्या पद्धतीने होणार सणोत्सव ऐवजी लसोत्सव साजरा करा - तहसीलदार


बल्लारपूर  तालुक्यात पोळा व तान्हा पोळा साध्या पद्धतीने होणार सणोत्सव ऐवजी लसोत्सव साजरा करा - तहसीलदार

🔸तहसीलदार संजय राईंचवार यांचे आवाहन

बल्लारपूर ( राज्य रिपोर्टर ) : आपली संस्कृती सण व उत्सव प्रिय आहे. यामुळे सणासुदीच्या दिवसात उत्साह असतो. मात्र कोरोना विषाणूचा संसर्ग कमी झाल्याचे दिसत असले तरी धोका टळला नाही. आपले आरोग्य निरोगी राहावे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये. यासाठी नागरिकांनी सणोत्सव ऐवजी लसोत्सव साजरा करा. पोळा व तान्हा पोळा साध्या पद्धतीने साजरा करा, असे आवाहन बल्लारपूर येथील तहसीलदार संजय राईंचवार यांनी जनतेला केले आहे.

बल्लारपूर तालुक्यात 17 ग्रामपंचायत आहेत. तालुका प्रशासनाने गावागावात पोळा व तान्हा पोळा सार्वजनिक ठिकाणी साजरा करू नये, म्हणून गावापातळीवर प्रशासनाला निर्देश दिले आहे.जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांच्या आदेशानुसार आगामी दिवसात पोळा, तान्हा पोळा व गणेशोत्सव आहे. या अनुषंगाने कोरोना प्रादुर्भाव टाळण्यासाठी व सार्वजनिक ठिकाणी गर्दी होऊ नये म्हणून जमावबंदी आदेश निर्गमित केला आहे. त्यामुळे सभा, सामाजिक, राजकीय, सार्वजनिक कार्यक्रम, मोर्चा, धरणे, उपोषण आदी उपक्रम बंद करण्यात आले आहे.

नागरिकांनी कोरोनाची पहिली व दुसरी लाट अनुभवली आहे. तिसरी लाट उंबरठ्यावर आली आहे.कोरोनाच्या प्रादुर्भावापासून नागरिकांच्या आरोग्याची काळजी महत्वाची आहे. सण, उत्सव आपण नेहमी साजरे करतो. मात्र कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी व कोरोनाच प्रादुर्भाव कमी करण्यासाठी आपल्या उत्सवावर संकट आले आहे.

बल्लारपूर तालुक्यात कोरोना विषाणूवर मात करण्यासाठी सार्वजनिक आरोग्य यंत्रणेच्या माध्यमातून कोविड लसीकरण मोहीम सुरु आहे.45 व 18 वर्षावरील सर्वांचे लसीकरण करून कोरोनाला हरवायचे आहे. यासाठी लसीकरण केंद्रावर पुरेशा प्रमाणात लसीचा पुरवठा केला आहे. पहिला व दुसरा डोज लसीचा घेऊन नागरिकांनी निरामय आरोग्य जगावे. सणोत्सव साजरा करताना, नागरिकांनी लसोत्सव देखील आनंदाने साजरा करावा, असे बल्लारपूर येथील तहसीलदार संजय राईंचवार यांनी सांगितले आहे.

गावातील व्यक्ती, संस्था, किंवा संघटना यांनी पोळा, तान्हा पोळा व गणेशोत्सव दरम्यान अंमलबजावणी व आदेशाचे पालन न केल्यास कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याची ताकीद देखील तहसीलदार राईंचवार यांनी दिली आहे. प्रशासनाच्या आदेशामुळे पोळा व तान्हा पोळा सणावर विरजण पडले आहे.







Post a Comment

0 Comments