वर्धा-बल्लारशाह, बल्लारशाह-गोंदिया रेल्वे केव्हा सुरू होणार, नागरिकांची पेसेंजर रेल्वे सुरू करण्याची मागणी ?
बल्लारपूर ( राज्य रिपोर्टर ) : कोरोना ससंर्ग कमी झाल्यानंतर आता सर्वच व्यवहार पूर्वपदावर येत आहेत. परंतु शेतकरी, लहान, मोठे व्यावसायिक, उद्योजक व जनसामान्यांसाठी अत्यंत उपयुक्त व सोयीस्कर असलेल्या पॅसेंजर रेल्वे गाड्या अजुनही सुरू करण्यात आलेल्या नाहीत. यात, गोंदिया-चंद्रपूर दरम्यान महत्त्वाची मानली जाणारी बल्लारशाह-गोंदिया ही पॅसेंजर रेल्वेगाडी अद्याप सुरु करण्यात आलेली नाही. त्यामुळे या मार्गावरील प्रवाश्यांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. गोंदिया बल्लारशाह पॅसेंजर रेल्वे गाडी सुरू करावी, अशी मागणी प्रवाश्यांनी केली आहे. या सोबतच मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी असलेली वर्धा-बल्लारशाह, अजनी-काजीपेठ ई पेसेंजर गाड्याही सुरू करण्याची मागणी होत आहे. कोरोना काळात डबघाईला आलेल्या ग्रामीण अर्थव्यवस्थेला शेती व्यवसायामुळेच बळ मिळाले आहे. व्यवसायावर अवलंबून असलेल्या किरकोळ व्यापारी व जनसामान्यांसाठी रेल्वे गाड्याअभावी बाजारपेठा अजूनही लांबच आहेत. त्यामुळे शेतकर्यांनी पिकविलेले धान्य, भाजीपाला मातीमोल भावाने विकला जाते. दळणवळणाच्या मर्यादित व खर्चिक साधनांमुळे शेतकरी, किरकोळ व्यावसायिक व जनसामान्य बाजारपेठेत पोहचू शकत नाहीत. दळणवळणाच्या स्वस्त व पर्याप्त साधनांअभावी बाजारपेठेत आपला माल विकता किंवा खरेदी करता येत नाही.
बल्लारशाह ते गोंदिया दरम्यान, बरेच लघु व्यवसायीक शेतकरी या रेल्वेगाडीवर अवलंबून आहेत. विशेषतः चंद्रपूर जिल्ह्यातील नागरिकांना मूल, नागभीड, ब्रम्हपुरी, वडसा, अर्जुनी मोरगाव, गोंदिया आदी परिसरातील लघु व्यवसायीक, व्यापारी व शेतकरी यांच्यासाठी गोंदिया-बल्लारशाह ही पॅसेंजर रेल्वेगाडी वरदान ठरली आहे दिवसाकाठी हजारो प्रवासी या रेल्वेगाडीने प्रवास करायचे. मात्र मागील वर्षीच्या कोरोना संसर्ग व टाळेबंदीमुळे या रेल्वेगाडीचे परिचलन बंद करण्यात आले आहे. परिणामी या मार्गावरील प्रवाश्यांना चंद्रपूर, अथवा गोंदिया या मोठ्या शहरात जायचे असल्यास एसटी बस किंवा खासगी वाहनाने प्रवास करावा लागतो. यामुळे त्यांना आर्थिक फटका बसतो. तेव्हा सर्वांसाठी सोयीचे व स्वस्त दळणवळणाचे साधन म्हणून बल्लारशाह-गोंदिया, वर्धा-बल्लारशाह, अजनी-काजीपेठ ई पॅसेंजर पूर्ववत सुरू करावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
0 Comments