कोरोनाच्या तिसऱ्या संभाव्‍य लाटेचा सामना करण्‍यासाठी प्रा. आ. केंद्रे, ग्रामीण रूग्‍णालये जनतेच्या सेवेत रूजु करावी – आ. सुधीर मुनगंटीवार

 



कोरोनाच्या  तिसऱ्या संभाव्‍य लाटेचा सामना करण्‍यासाठी प्रा. आ. केंद्रे, ग्रामीण रूग्‍णालये जनतेच्या सेवेत रूजु करावी – आ. सुधीर मुनगंटीवार

🔸ग्रामीण  रूग्‍णालय पोंभुर्णा, प्रा. आ. केंद्र मानोरा, कळमना यांची केली पाहणी व घेतला आढावा

🔸10 ऑक्टोबरला कळमना तर 10 नोव्हेंबरला मानोरा येथील प्रा. आ. केंद्राचे लोकार्पण होणार

 

चंद्रपूर ( राज्य रिपोर्टर ) : कोरोनाची तिसरी लाट महाराष्‍ट्रात येणार असल्‍याचे मा. मुख्‍यमंत्र्यांसह टाक्‍सफोर्सने अंदाज व्‍यक्‍त केला आहे. सर्वच मंत्री याबाबत सतत वक्तव्य करीत आहेत.त्‍यामुळे तिस-या लाटेचा सामना करण्‍यासाठी आरोग्‍य यंत्रणांनी सज्‍ज राहणे अत्‍यंत गरजेचे आहे. दुस-या लाटेदरम्‍यान चंद्रपूर जिल्‍हयात मोठया प्रमाणावर रूग्‍संख्‍या होती. मृत्‍युदर सुध्‍दा जास्‍त होता. व्हेंटीलेटरअभावी, बेड्सअभावी अनेक रूग्‍णांना आपला जीव गमवावा लागला. तिस-या लाटेदरम्‍यान याची पुनरावृत्‍ती होवू नये व उत्‍तम आरोग्‍य सुविधा त्‍यांना उपलब्‍ध व्‍हाव्‍या यादृष्‍टीने ज्‍या प्राथमिक आरोग्‍य केंद्रांच्‍या, ग्रामीण रूग्‍णालयाच्‍या इमारती बांधून तयार आहेत त्‍या लवकरात लवकर जनतेच्‍या सेवेत रूजु कराव्‍या असे निर्देश लोकलेखा समितीचे प्रमुख तथा माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी दिले.

 

दिनांक ८ सप्‍टेंबर रोजी आ. सुधीर मुनगंटीवार यांनी बल्‍लारपूर तालुक्‍यातील मानोरा, कळमना येथील प्राथमिक आरोग्‍य केंद्रांची पाहणी करत त्‍याठीकाणी आढावा बैठक घेतली. त्‍याचप्रमाणे पोंभुर्णा येथील ग्रामीण रूग्‍णालयाची सुध्‍दा पाहणी केली व आढावा घेतला. यावेळी जिल्‍हा परिषदेच्‍या अध्‍यक्षा सौ. संध्‍या गुरनुले, जिल्‍हा शल्‍य चिकीत्‍सक डॉ. निवृत्‍ती राठोड, जिल्‍हा आरोग्‍य अधिकारी डॉ. गहलोत, जिल्‍हा परिषदेचे उपमुख्‍य कार्यकारी अधिकारी, बल्‍लारपूरचे तहसिलदार श्री. संजय राईंचवार, पोंभुर्णा पंचायत समितीच्‍या सभापती अलका आत्राम, सौ. ज्‍योती बुरांडे, विनोद देशमुख, जिल्‍हा परिषद सदस्‍य राहूल संतोषवार, अजित मंगळगिरीवार, बल्‍लारपूर पंचायत समितीचे सभापती सौ. इंदिरा पिपरे, सोमेश्‍वर पदमगिरवार, जिल्‍ह परिषद सदस्‍या सौ. वैशाली बुध्‍दलवार, रमेश पिपरे, मानोरा येथील सरपंच व उपसरपंच तसेच कळमना येथील सरपंच व उपसरपंच यांची उपस्थिती होती.  

 

बल्‍लारपूर तालुक्‍यातील मानोरा आणि कळमना येथील प्राथमिक आरोग्‍य केंद्राच्‍या इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले आहे. आ. मुनगंटीवार यांच्या अर्थमंत्री पदाच्या कार्यकाळात मंत्रिमंडळाची विशेष बाब म्हणून परवानगी घेत मानोरा येथे प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर करण्यात आले. याठिकाणी आवश्‍यक उपकरणे, यंत्रसामुग्री उपलब्‍ध करत कर्मचारी वृंद नेमून सदर दोन्‍ही प्राथमिक आरोग्‍य केंद्रे जनतेच्‍या सेवेत रूजु करावी असे निर्देश त्‍यांनी यावेळी दिले.टाटा एज्यूकेशन व डेव्हलपमेंट ट्रस्ट च्या सीएसआर निधीच्या  माध्यमातून  माध्यमातून 15 बेड , 16 ऑक्सिजन पॉइंट व इतर महत्वपूर्ण उपकरणे मंजूर करविली आहे. सदरचे साहित्य कळमना प्राथमिक आरोग्य केंद्र येथे वापरून ऑक्सिजन सुविधायुक्त कोरोना केअर सेंटर तयार करण्यात येणार आहे.10 ऑक्टोबर  रोजी कळमना तसेच 10 नोव्हेंबर रोजी मानोरा येथील प्रा. आ. केंद्राचे लोकार्पण करण्याचा निर्णय बैठकीत करण्यात आला.

पोंभुर्णा येथे ३० खाटांच्‍या ग्रामीण रूग्‍णालयाचे बांधकाम पूर्ण झाले आहे. वैद्यकिय अधिक्षक गट अ, वैद्कीय अधिकारी गट अ, अधिपरिचारीका, सहाय्यक अधिक्षक, भांडारपाल, औषध निर्माण अधिकारी, कनिष्‍ठ लिपीक अशी १० पदे त्‍वरीत भरण्‍याची आवश्‍यकता आहे. यासंबंधीचा प्रस्‍ताव राज्‍य शासनाकडे सादर करण्‍यात आलेला आहे. सदर ग्रामीण रूग्‍णालयाला डीडीओ कोड प्राप्‍त झाला आहे. या ग्रामीण रूग्‍णालयात आवश्‍यक यंत्रसामुग्री उपकरणे उपलब्‍ध करण्‍याबाबतचा प्रस्‍ताव सुध्‍दा जिल्‍हा शल्‍य चिकीत्‍सकांच्‍या माध्‍यमातुन शासनाकडे सादर करण्‍यात आला आहे. यासंदर्भात आरोग्‍य मंत्री राजेश टोपे व आरोग्‍य विभागाचे प्रधान सचिव श्री. व्‍यास यांच्‍याशी चर्चा केलेली आहे. संबंधित यंत्रणांनी यासंबंधीचा पाठपुरावा करून ग्रामीण रूग्‍णालय जनतेच्‍या सेवेत लवकरात लवकर रूजु करण्‍याची आवश्‍यकता आहे, असेही आ. मुनगंटीवार यावेळी झालेल्‍या आढावा बैठकीत म्‍हणाले. 







Post a Comment

0 Comments