क्रांतीची ज्वलंत मशाल म्हणजेच 'क्रांती दिन'

 

क्रांतीची ज्वलंत मशाल म्हणजेच  'क्रांती दिन'

बल्लारपूर ( राज्य रिपोर्टर ) : आज 9 ऑगस्ट. आजच्या दिवशी 1942साली महात्मा गांधीजींनी 'छोडो भारत' व 'करेंगे या मरेंगे' चा नारा दिला होता. यामुळे संपूर्ण देश पेटून उठला. शांततेच्या मार्गाने स्वातंत्र्याचे आंदोलन करणार्‍या काँग्रेस आणि नेत्यांनी प्रथमच क्रांतीची भाषा वापरली होती. त्यामुळे हा 9 ऑगस्ट क्रांतीदिन म्हणून पुढे ओळखला जाऊ लागला. देशाच्या स्वातंत्र्यासाठी स्फूर्तीदायी ठरलेल्या या दिवसाची आठवण तसेच नव्या पिढीला क्रांतिकारकांच्या त्यागाची जाणीव रहावी यासाठी दरवर्षी 9 ऑगस्ट रोजी क्रांतीदिन साजरा केला जातो. देशभरात ब्रिटिश सत्तेला हाकलून लावण्यासाठी पुढे आंदोलनांना सुरवात झाली. ब्रिटिश सत्ता पार हादरून गेली होती. हे रोखायचे कसे? असा प्रश्न त्यांना पडला होता. अशात हे आंदोलन देशभर पसरणार म्हणून 9 ऑगस्टच्या पहाटेच महात्मा गांधी, पंडित नेहरू, वल्लभभाई पटेल, मौलाना आझाद यांच्यासह अनके काँग्रेस नेत्यांना पकडून तुरुंगात टाकण्यात आले.

भारतीय जनमानसात असंतोषाचा विस्फोट झाला त्यामुळे ब्रिटिश शासन भयभीत झाले. एकाच वेळी देशभर कारवाया सुरू झाल्या व महत्त्वाच्या कार्यकर्त्यांना अटक सत्र सुरू केले अनेक नेते भूमिगत झाले. देशभर पोलीस ठाण्यावर व मामलेदार कचेरीवर, सरकारी कार्यालयांवर मोर्चे निघू लागले. हातात तिरंगा झेंडा व घोषणा देत लाठीचार्ज व गोळीबार झेलत तिरंगा फडकू लागला. 

समाजवाद्यांनी भूमिगत कारवायांवर लक्ष केले. रेल्वे स्थानके मोडतोड, रूळ उखडणे, पोस्ट कार्यालय जाळणे, वीज तोडणे, गनिमी पद्धतीने ही कामे सुरू झाली. पोलिसांकडून अटक सत्र सुरू झाले. व्यापारी, विद्यार्थी, नोकरदार, सामान्य नागरिक, स्त्री-पुरुष या आंदोलनात सहभागी झाले. देशभरातील युवकांनी यात भाग घेतला. देशभर स्वातंत्र्याचे व देशभक्‍तीचे वातावरण निर्माण झाले होते. “चले जाव’मुळे क्रांतिसिंह नाना पाटील यांनी महाराष्ट्रात प्रतिसरकारची स्थापना केली. हे आंदोलन उभे राहण्याआधीच ब्रिटिश सरकारने मोडून काढण्याचे ठरवले होते. त्या पद्धतीने देशभर कारवाया केल्या आणि आंदोलन मोडून काढले. पण या आंदोलनाने जगाला वेगळी ओळख दिली. कारण कोणताच सेनापती नसताना स्वातंत्र्याचे युद्ध जनतेने हातात घेतले होते. यामुळेच भारत स्वातंत्र्याचा विचार केला जाऊ लागला हे विशेष. 

आज आपल्या देशासाठी सर्वस्व अर्पण करणाऱ्या सर्व क्रांतीकारकांना विनम्र अभिवादन करूयात!






Post a Comment

0 Comments