आदिवासींची संस्कृती व जीवनमूल्य साऱ्या समाजाला ठरतील प्रेरणादायी - ॲड. संदीप पाटील...!

 

आदिवासींची संस्कृती व जीवनमूल्य साऱ्या समाजाला ठरतील प्रेरणादायी - ॲड. संदीप पाटील...! 

जळगाव/चोपडा ( राज्य रिपोर्टर ) : येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित, कला, शास्त्र व वाणिज्य महाविद्यालयात जागतिक आदिवासी दिनानिमित्त विद्यार्थी विकास विभाग व मराठी विभागातर्फे राज्यस्तरीय ऑनलाईन आदिवासी कविसंमेलनाचे आयोजन करण्यात आलेले होते. या कार्यक्रमामध्ये उदघाटक म्हणून महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे अध्यक्ष मा.भैय्यासाहेब ॲड. संदीप सुरेश पाटील तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य प्रा. डॉ. ए. एल. चौधरी ऑनलाईन उपस्थित होते. या कार्यक्रमाप्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. डॉ. व्ही. टी. पाटील, प्रा. एन. एस. कोल्हे, 

उपप्राचार्य व मराठी विभाग प्रमुख डॉ. के. एन. सोनवणे ऑनलाईन उपस्थित होते. या राज्यस्तरीय ऑनलाईन आदिवासी कविसंमेलनाचे प्रास्ताविक विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. शैलेश वाघ यांनी केले. यावेळी ॲड. संदीप सुरेश पाटील हे आपले उदघाटनपर मनोगत व्यक्त करतांना म्हणाले की, आदिवासी समाज शिक्षण घेऊन प्रगत होत आहे. शासनातर्फे आदिवासी जमातीला विविध प्रकारच्या योजना सुरू करून त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. आदिवासी क्रांतिकारकांचा इतिहास साऱ्या समाज बांधवांनी वाचायला हवा. आदिवासी साहित्यातील आदिवासींची समाजमूल्ये व  संस्कृती या समजून घ्यायला हव्यात. त्यातून प्रेरणादायी विचार निश्चितपणे इतरही समाजाला मिळतील. यावेळी ऑनलाईन राज्यस्तरीय आदिवासी कविसंमेलनात महाराष्ट्रातील विविध भागातून एकूण वीस कवींनी सहभाग नोंदविला होता. यामध्ये कविवर्य डॉ. सखाराम डाखोरे (वसई)-मोर्चे, कविवर्य काळूदास कनोजे (त्र्यंबकेश्वर, नाशिक)-लेक निसर्ग राजाची, कविवर्य देवदत्त चौधरी (पेठ, नाशिक)-तांब्या भरून पाणी देजोस, कविवर्य रवी बुधर (जव्हार, पालघर)-आदिवासी वारल्याची पोर, कविवर्य तुकाराम चौधरी (नाशिक)-माझा बा कोणाला कळलाच नाय, कविवर्य देवचंद महाले (गणेशगाव, त्र्यंबकेश्वर)-उमेद, कविवर्य संजय दोबाडे (त्र्यंबकेश्वर)-मचाण, कविवर्य रमजान तडवी (यावल, जळगांव)-तडवी भिल्ल बोली, कविवर्य अरुण मोरे (चोपडा)-जखम, कविवर्य किशोर डोके (जव्हार)-सर्क्युलेशन, कविवर्य कृष्णा राऊत (त्र्यंबकेश्वर)-निसर्गप्रेमी, कविवर्य रोहिदास डगळे (खिरविरे, अकोले)-काळा इख, कविवर्य विठ्ठल निरवारे (अमरावती)-बरोबरीके लेकरूना, कविवर्य नारायण कुंवर (देवडोंगरा, त्र्यंबकेश्वर)-आदिमराजा,  कविवर्य तानाजी साबळे (अकोले)-जोंधळे दळते माय माझी जात्यावर, कविवर्य पंकजकुमार गवळी(नाशिक) -उभा राहू कसा मी, कविवर्य अंबादास खोटरे (त्र्यंबकेश्वर) -आदिवासी जीवन व आदिवासी देवता इत्यादी कवींनी आदिवासी जीवन, संस्कृती, परंपरा, निसर्ग, जल, जंगल, जमीन यासंबंधीचे प्रश्न , दारिद्रय, पूर, धरण ग्रस्तांच्या व्यथा यावर प्रकाश टाकणाऱ्या कविता सादर करून रसिकांना अंतर्मुख केले. या कार्यक्रमाचे अध्यक्षीय मनोगत व्यक्त करतांना प्रभारी प्राचार्य प्रा. डॉ. ए. एल. चौधरी म्हणाले की, आदिवासी समाजातील अनेक क्रांतिकारकांनी स्वातंत्र्य प्राप्तीसाठी प्राणार्पण केले आह. परंतु आदिवासी क्रांतिवीरांचा इतिहास समाजासमोर आला नाही. तो उपेक्षित राहिला ही शोकांतिका आहे. आदिवासी समाज हा शहरी भागापासून दूरवर डोंगर, दऱ्या खोऱ्यात, पहाडी भागात राहणारी जमात आहे. या जमातीची संस्कृती, परंपरा, मूल्ये, धारणा, समाजव्यवस्था, जीवन पद्धती इतर समाजापेक्षा खूपच वेगळी व वैशिष्ट्य पूर्ण आहे. आदिवासी समाज शिक्षित समाजापासून दूर असला तरी या समाजाची मूल्य उच्च दर्जाची आहेत ते समजून घेण्यासाठी आदिवासी साहित्य वाचणे व समजून घेणे आवश्यक आहे. 

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. एम. एल. भुसारे यांनी केले तर आभार सहाय्यक विद्यार्थी विकास अधिकारी डी. डी. कर्दपवार यांनी मानले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महिला कार्यक्रमाधिकारी डॉ. पी. एम. रावतोळे व डॉ. एल. बी. पटले यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमाप्रसंगी महाविद्यालयातील बहुसंख्य विद्यार्थी, शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी व काव्यरसिक ऑनलाईन उपस्थित होते.








Post a Comment

0 Comments