देशाच्या सर्वोच्च न्यायालयासमोर महिला आणि पुरुषाचा आत्मदहनाचा प्रयत्न : दोघेही गंभीर, उपचार सुरू

 

देशाच्या सर्वोच्च न्यायालयासमोर महिला आणि पुरुषाचा आत्मदहनाचा प्रयत्न : दोघेही  गंभीर, उपचार सुरू

नवी दिल्ली ( राज्य रिपोर्टर ) : सर्वोच्च न्यायालयासमोर एक महिला आणि एका पुरुषाने आत्मदहन करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. भगवान दास रोडवरील गेट नंबर डी समोर एक महिला आणि एका पुरुषाने स्वत:ला आग लावून घेतली. जखमी दोघांनाही राम मनोहर लोहिया रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून, सुरक्षेच्या दृष्टीने न्यायालय परिसरात पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. न्यायालयाच्या गेटवरील पोलिस कर्मचा-यांनी या दोघांना स्वत:ला आग लावताना पाहिले. त्यानंतर ते लगेच आग विझवण्यासाठी ब्लँकेट घेऊन धावले. दोघांना तातडीने पोलिस व्हॅनमध्ये राम मनोहर लोहिया रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि त्यांच्यावर उपचार सुरू आहेत, असे नवी दिल्लीचे पोलिस उपायुक्त दीपक यादव यांनी सांगितले. जखमी दोघेही गेट नंबर डी मधून न्यायालयात जाण्याचा प्रयतन करत होते. मात्र, त्यांच्याजवळ ओळखपत्र नसल्याने त्यांना सुरक्षा रक्षकांनी अडवले. तेवढ्यात त्या दोघांनी स्वत:ला आग लावून घेतली. हे दोघे न्यायालय परिसरात आले तेव्हा त्यांच्या हातात एक बाटली होती, अशी माहिती मिळत आहे. या बाटलीत ज्वलनशील पदार्थ असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दरम्यान पोलिस या प्रकरणाचा तपास करत असून या दोघांनी न्यायालय परिसरात आत्मदहन करण्याचा प्रयत्न का केला, याचाही तपास केला जात आहे.







Post a Comment

0 Comments