श्री गणेश मूर्तीच्या दुकानात पीओपी मूर्ती आढळल्यास १० हजारांचा दंड, दुकाने सील, डिपॉझिट जप्त आणि दोन वर्षे बंदीसह प्रदूषण नियंत्रण कायद्यानुसार फौजदारी कारवाई

श्री गणेश मूर्तीच्या दुकानात पीओपी मूर्ती आढळल्यास १० हजारांचा दंड, दुकाने सील, डिपॉझिट जप्त आणि दोन वर्षे बंदीसह प्रदूषण नियंत्रण कायद्यानुसार फौजदारी कारवाई

🔸मूर्तिकारांना मनपाकडे नोंदणी आवश्यक  

🔸नोंदणी न करता मूर्ती विक्री करणाऱ्यावर होणार कारवाई


चंद्रपूर( राज्य रिपोर्टर ) : गणेशोत्सवासह विविध उत्सवात मातीच्या मूर्ती विक्री करणाऱ्या मूर्तीकारांना चंद्रपूर शहर महानगरपालिकेकडे नोंदणी करणे अनिवार्य करण्यात आले आहे. नोंदणी न करता मूर्ती विक्री करणाऱ्यावर कारवाईच्या सूचना देण्यात आल्या आहेत. ही नोंदणी आपापल्या परिसरातील झोन कार्यालयात करायची आहे. तसेच पीओपी मूर्तीची विक्री, आयात आणि निर्मिती करताना आढळल्यास दंडात्मक कारवाईसह फौजदारी गुन्हा दाखल होणार आहे.

मूर्ती विक्री करणाऱ्या सर्व मूर्तिकारांची नोंदणी करण्यात येणार आहे. नोंदणीसाठी २०० रुपये आणि डिपॉझिट रक्कम ३ हजार रुपये निश्चित करण्यात आले आहे. गणेशोत्सवानंतर डिपॉझिट रक्कम परत देण्यात येईल. नोंदणीसाठी झोननिहाय मुख्य स्वच्छता निरीक्षक नियुक्त करण्यात आले आहेत. मूर्ती विक्रीच्या ठिकाणी नोंदणी प्रमाणपत्र दर्शनी भागात लावणे अनिवार्य आहे. नोंदणी न करता मूर्ती विकताना आढळल्यास सक्त कारवाई केली जाणार आहे.

केंद्र शासनाने श्रीगणेशाच्या पीओपी मूर्तींवर बंदी जाहीर केलेली आहे. त्यानुसार चंद्रपूर शहरामध्ये पीओपी मूर्तींची निर्मिती, आयात, साठा व विक्री होऊ नये, यासाठी कडक अंमलबजावणी होणार आहे. गणेश मूर्तीच्या दुकानात पीओपी मूर्ती आढळल्यास १० हजारांचा दंड, दुकाने सील, डिपॉझिट जप्त आणि दोन वर्षे बंदीसह प्रदूषण नियंत्रण कायद्यानुसार फौजदारी कारवाई केली जाईल, असे आदेश मनपाचे आयुक्त राजेश मोहिते यांनी दिले.
कारवाईकरिता सहायक आयुक्त यांच्या नेतृत्वात,  सहाय्यक अधिक्षक, कनिष्ठ अभियंता, मुख्य स्वच्छता निरीक्षक, पोलीस प्रतिनिधी, इको-प्रो सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी, मूर्तीकार प्रतिनिधी यांची समिती गठीत करून तिन्ही झोनमध्ये पथक तैनात राहणार आहे.
मूर्ती विकताना विक्रेते आणि खरेदी करणाऱ्या भाविकांनी मास्कचा नियमित वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षित अंतर राखणे याचे पालन करावे, स्वत:ची काळजी घ्यावी व प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन महापौर राखी संजय कंचर्लावार व मनपा आयुक्त राजेश मोहिते यांनी केले आहे.









Post a Comment

0 Comments