9 वर्षात प्रथमच मिळाला राखीचा मान - स्वच्छता दुतांचे भावपूर्ण मनोगत

 

9 वर्षात प्रथमच मिळाला राखीचा मान  - स्वच्छता दुतांचे भावपूर्ण मनोगत

राजुरा ब्राह्मण सभेच्या महिलांनी केले सफाई कामगारांसोबत रक्षाबंधन

राजुरा ( राज्य रिपोर्टर ) : राखी असा सण जो प्रत्येक भावा बहिणीच्या अत्यंत जिव्हाळ्याचा आहे. सातासमुद्रापलीकडे असलेल्या भावाला किंवा बहिणीला भेटीसाठी व्याकुळ करणारा, एकमेकांच्या ओढीने मायेने ओढणारा भावाच्या प्रगतीसाठी निर्व्याज भावनेने प्रार्थना करणारा तर तितक्याच हक्काने आपल्या रक्षणाची जबाबदारी त्याच्यावर सोडविणारा अंतर्मनाला साद घालणारा हा सण.

बरे हा सण साजरा करताना नाते रक्ताचे असणे गरजेचे असते असे नाही. जिथे हृदयातून साद येते दादा ये किंवा ताई मी आहे तुझ्या सोबतीला तुला काळजी करण्याचे कारण नाही तुझा हा बंधु तुझा सखा कृष्ण बनून तुझ्या रक्षणासाठी तत्पर आहे हे शब्दात नाही तर कृतीत सिद्ध करणारा सण म्हणजे निर्व्याज प्रेमाची केवळ अनुभुती असते. राजुरा तालुका ब्राह्मण सभेच्या महिला सदस्यांनी रक्षाबंधनाचा सोहळा आयोजित केला होता आणि त्यासाठी त्यांनी साद घातली शहरातील सर्वांचे आरोग्य जपण्यासाठी, शहराला स्वच्छ ठेऊन स्वतः घाणीत काम करणार्‍या स्वच्छता दुतांना. बहिणीच्या मायेने आलेल्या सादेला तितक्याच तत्परतेने नगर पालिका राजुरा अंतर्गत काम करणार्‍या स्थायी तसेच कंत्राटी सफाई कर्मचाऱ्यांनी प्रतिसाद देऊन भावाचे कर्तव्य बजावत हजेरी लावली.

ब्राह्मण सभेच्या भगिनींनी अत्यंत मनातून सर्वांचे स्वागत करून आपल्या भावंडांना औक्षण करून राख्या बांधल्या व प्रथेप्रमाणे त्यांना मिठाई देऊन त्यांचे तोंड गोड केले त्याचप्रमाणे सुग्रास अल्पोपाहार देऊन भावांचे मन कौटुंबिक वातावरणनिर्मितीमुळे तृप्त केले. भगिनींच्या जिव्हाळ्याच्या वागणुकीमुळे व मिळालेल्या सन्मानामुळे भारावलेल्या वाल्मिक चंद्रजी बोटकावार, श्यामराव किसन मेश्राम, लक्ष्मण वासुदेव येंग्लवार, निखिल संजय सुर्तेकर, किशोर वरवाडे ह्यांनी आपले मनोगत व्यक्त करताना भावा बहिणीचे नाते सांगत आपले भावविश्व उघड केले त्याचप्रमाणे कंत्राटी पद्धतीने शहरात कार्यरत असलेल्या स्वच्छता दुतांनी म्हंटले की आम्ही राजुरा शहरात मागील 9 वर्षा पासुन कार्यरत आहोत मात्र आजपर्यंत कुणीही, कोणत्याही समाजाने आम्हाला माणुस समजुन आमच्यासोबत नाते जोडले नाही मात्र आज पहिल्यांदाच ह्या शहरात आम्हाला बहिणी मिळाल्या.

9 वर्षात प्रथमच आम्हाला राखी बांधुन अत्यंत आपुलकीने आमचा सन्मान केल्या जात असल्याने आम्ही निःशब्द झालो आहे. आम्ही शहराला स्वच्छ ठेवण्यासाठी घाणीत काम करतो, कोरोना काळातही स्वतःच्या जिवाची पर्वा न करता आम्ही सतत कार्यरत होतो तरीही बरेचदा आमच्याकडे बघण्याचा लोकांचा दृष्टिकोन वेगळा असतो मात्र आज आमच्या बहिणींनी, आम्ही सुद्धा माणुस आहोत, आम्हालाही मन आहे हे जाणुन घेतले, आम्हाला आपुलकीने सन्मानाने आमंत्रित केले ह्यातच आमच्या परिश्रमाचे चीज झाले अशा आत्मीय भावना व्यक्त केल्या. 

श्वेता अपराजित, अनुष्का रैच, नम्रता खोंड, मीरा कुळकर्णी, पुजा घरोटे काव्या भाकरे, ऋचा देशपांडे, वीणा देशकर, स्वाती देशपांडे, राजश्री देशपांडे, मनिषा भाके, वैजयंति देशकर, राधिका धनपावडे, ज्योती देशपांडे, वैष्णवी देशमुख, वणिता देशमुख, सगुणा अवधूत ह्यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले. 















Post a Comment

0 Comments