5 पीडितांवर रुग्णालयात उपचार सुरू तर 12 व्यक्तीवर गुन्हे दाखल, जादूटोण्याच्या संशयावरून दलित समाजातील वृध्द व महिलांना भर चौकात बांधून मारहाण !

5 पीडितांवर रुग्णालयात उपचार सुरू तर 12 व्यक्तीवर गुन्हे दाखल, जादूटोण्याच्या संशयावरून दलित समाजातील वृध्द व महिलांना भर चौकात बांधून मारहाण ! 

🔹भरचौकात त्यांचे हातपाय बांधून जबर मारहाण

 🔹पुरोगामी महाराष्ट्रात चाललंय तरी काय ? 

चंद्रपूर ( राज्य रिपोर्टर ) : फुले-शाहू-आंबेडकरांचा वारसा लाभलेल्या पुरोगामी महाराष्ट्राला झालंय तरी काय आपल्या देशाला स्वातंत्र्य प्राप्त होऊन 74 वर्ष पूर्ण झालीत आपण स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करीत आहोत तसेच पुरोगामी म्हणणाऱ्या महाराष्ट्रात श्याम मानव व नरेंद्र दाभोळकरसारखे विचारवंत आपला जीव तोडून इतकंच नव्हे तर नरेंद्र दाभोळकर सारख्या विचारवंतानी आपल्या प्राणाची आहुती देऊनही महाराष्ट्रात अंधश्रद्धा निर्मूलन समिती च्या प्रबोधनाच्या कार्यात खंड पडू दिला नसतानाही अंधश्रध्देच्या नावावर आजही अनेक ठिकाणी दलितांवर अन्याय अत्याचार होतांना दिसतात अशीच घटना महाराष्ट्राच्या पूर्व सीमेवर असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यात घडली आहे.

            चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती तालुक्यातील वणी या गावात जादूटोणा केल्याच्या संशयावरून  गावकऱ्यांनी मिळून दलित समाजातील काही लोकांना भरचौकात त्यांचे हातपाय बांधून जबर मारहाण केली. ही घटना शनिवारी घडली. याबाबत पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मात्र कुणावर केला, हे सांगण्यास पोलिसांनी नकार दिला. गावाच्याबाहेर पोलिसांचा चोख बंदोबस्तही आहे. कुणालाही गावात येऊ दिले जात नाही आहे. संपूर्ण राज्यात खळबळ उडवून देणारी ही घटना असतानाही या प्रकरणाबाबत पोलीस मात्र अतिशय गोपनीयता बाळगत असल्याचे दिसून येते. शहर विकसित होत असले तरी गावखेड्यातून अजूनही अंधश्रद्धा गेलेली नाही, हे या समाजाला काळिमा फासणाऱ्या घटनेतून समोर येते. केवळ अंधश्रध्देला बळी जाऊन गावकऱ्यांनी मिळून दलित समाजातील लोकांना मारहाण करणे अतिशय क्रूर असल्याचे आता बोलले जात आहे. विशेष म्हणजे, वृद्ध, महिला, लहान बाळ कोणाचाही विचार न करता बेदम मारहाण करण्यात आली आहे. यात पाच जण गंभीर जखमी झाले असून त्यांना जिवती ग्रामीण रुग्णालयातून चंद्रपूरला हलवण्यात आलेले आहे. एवढा सगळा प्रकार होत असतानाही पोलीस प्रशासन झोपले होते काय, असा प्रश्न आता पुढे येत आहे. सध्या शांतता आहे. गावात कुनालाही जाऊ दिले जात नसल्याने या प्रकरणाबाबत अधिकची माहिती मिळू शकली नाही. मात्र मारहाण झालेल्या कुटुंबातील इतर सदस्यांना गाव सोडावे लागले ग्रामपंचायत पदाधिकारी, पोलीस पाटील ही घटना घडताना काय करीत होते, असे अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत.

 





Post a Comment

0 Comments