रेल्वे पोलीस कोठडीत झालेल्या अनिल मडावी मृत्युप्रकरणी गृहमंत्र्यांकडे तक्रार - आ. सुधीर मुनगंटीवार


रेल्वे पोलीस कोठडीत झालेल्या अनिल मडावी मृत्युप्रकरणी गृहमंत्र्यांकडे तक्रार - आ. सुधीर मुनगंटीवार

 अनिल मडावी मृत्यू प्रकरणाची सीआयडी चौकशी : रेल्वे पोलीस अडचणीत येण्याची शक्यता ?

                                         

बल्लारपूर ( राज्य रिपोर्टर ) : रेल्वे पोलिसांनी ९ जुलै रोजी विरूर स्टेशन येथून चार तरुणांना पकडून नेले होते. १३ जुलै रोजी रेल्वे पाेलिसांनी अनिल मडावी यांची आई विमल मडावी यांना तुमचा मुलगा फिट आल्याने मरण पावला. त्याचा मृतदेह चंद्रपूरहून घेऊन जावा, असा निरोप दिला होता. आपल्या मुलाचा मृत्यू रेल्वे पोलिसांच्या कोठडीत मारहाणीत झाल्याची तक्रार विरूर पोलिसात करून, मृतदेह घेण्यास नकार दिला. यानंतर, राजुराचे माजी आमदार ॲड.संजय धोटे आणि राज्याचे माजी अर्थमंत्री व लोकलेखा समितीचे प्रमुख आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी या प्रकरणाचे गांभीर्य ओ‌ळखून गृहमंत्र्यांकडे तक्रार केली होती. गृहमंत्र्यांनी मुंबईहून राजलक्ष्मी शिवणकर यांच्या नेतृत्वातील तीन सदस्यीय पथक पाठवून चौकशी सुरू केली आहे.

आज हे पथक विरूर स्टेशन येथे पोहोचले. दरम्यान, मृतक अनिलची आई विमल मडावी व त्याच्या बहिणीची विचारपूस केली, तसेच रेल्वे पोलिसांनी अनिल मडावीसोबत गावातील तीन जणांनाही सोबत नेले होते. मात्र, त्यांच्यावर कोणतीही कारवाई न करता सोडून दिले. या तीनही युवकांचे जबाब या पथकाने नोंदविल्याची माहिती सूत्रांनी दिली. हे पथक बल्लारपूर पोलीस ठाण्यातही पोहोचले होते. तेथे पोलिसांकडून काही चौकशी केल्याचे समजते. या प्रकरणात रेल्वे पोलीस कोठडीत अनिल मडावीचा मृत्यू झाल्याने व त्याच्या सोबतच्या तरुणांना कोणतीही कारवाई न करता सोडून दिल्याने, रेल्वे पोलीस गोत्यात येण्याची शक्यताही सूत्राने वर्तविली आहे.

नियम असा आहे की, कोठडीतील मृत्यू हे गंभीर प्रकरण मानले. कोठडीतील मृत्यू झाल्याचे कळले, तर अधिवेशन थांबविले जाते. आधी कोठडीतील मृत्यूवर चर्चा होते. कोठडीत उद्या कोणी कोणालाही मारू शकते. यासाठी हा नियम आहे. रेल्वे पोलीस कोठडीत झालेल्या अनिल मडावी मृत्युप्रकरणी गृहमंत्र्यांकडे तक्रार केली होती. त्यांच्याशी चर्चा केली. त्यांनीही हे प्रकरण गंभीर असल्याचे म्हटले होते. त्याच अनुषंगाने ही चौकशी सुरू आहे.

- आ.सुधीर मुनगंटीवार, माजी अर्थमंत्री व लोकलेखा समिती प्रमुख, म.रा.



Post a Comment

0 Comments