अतिवृष्टीच्या अनुषंगाने मनपाच्या सर्व विभागांनी सज्ज राहावे - मनपाचे अतिरिक्त आयुक्त विपीन पालीवाल यांचे निर्देश

 

अतिवृष्टीच्या अनुषंगाने मनपाच्या सर्व विभागांनी सज्ज राहावे - मनपाचे अतिरिक्त आयुक्त विपीन पालीवाल यांचे निर्देश


आपत्ती व्यवस्थापन आढावा : नदी आणि नाल्यांच्या काठावर राहणाऱ्या नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना

चंद्रपूर( राज्य रिपोर्टर )  : मागील ४८ तासापासून सतत पाऊस सुरु असल्याने नदी-नाले भरून वाहण्याची शक्यता आहे. जर पावसाचे प्रमाण असेच राहीले तर महानगरपालिका हद्दीत जीवीत संरक्षणाच्या दृष्टीने मनपाच्या सर्व विभागांनी सज्ज राहावे, तसेच नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज ठेवण्याचे निर्देश मनपाचे अतिरिक्त आयुक्त विपीन पालीवाल यांनी दिले.

मनपाच्या नवीन प्रशासकीय इमारतीत शुक्रवारी (ता. २३) आयोजित आपत्ती व्यवस्थापन आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी उपायुक्त विशाल वाघ, उपायुक्त अशोक गराटे, शहर अभियंता महेश बारई, सहायक आयुक्त शीतल वाकडे, सहायक आयुक्त धनंजय सरनाईक, सहायक आयुक्त विद्या पाटील, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. अविष्कार खंडारे, आरोग्य अधिकारी (स्वच्छता) डॉ. अमोल शेळके यांच्यासह सर्व विभागाचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.

मनपाचे अतिरिक्त आयुक्त विपीन पालीवाल यांनी पावसाळ्याचा दिवसात घ्यावयाच्या उपाययोजनांचा आढावा घेतला. जर पावसाचे प्रमाण वाढते राहीले तर इरई धरणात निर्माण होणाऱ्या अधिकच्या पाणीसाठ्यामुळे शहरातील ज्या वस्तीत पाणी घुसण्याची शक्यता आहे, तिथे सर्व आवश्यक पूर्व तयारी करावी, नदी आणि नाल्यांच्या काठावर राहणाऱ्या नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्याचे निर्देशही दिले.

आपत्ती व्यवस्थापनाच्या दृष्टीने इर्मजन्सी लाईट, बोट, लाईफ जाकेट, बोट मशिन, फायर सुट व इतर संबंधित जीवनसंरक्षक साहित्य पुरेशा प्रमाणात उपलब्ध ठेवावे. सर्व संबंधित यंत्रणांनी आपत्ती व्यवस्थापन चोखरित्या करण्याच्या दृष्टीने सज्ज रहावे, अशा सुचना अतिरिक्त आयुक्त विपीन पालीवाल यांनी संबंधितांना यावेळी दिल्या.

शहरात पूरस्थिती निर्माण झाल्यास नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यासाठी आपत्ती व्यवस्थापनात अग्निशमन विभाग आणि स्वच्छता विभागासह स्वयंसेवी संस्थांची मदत घेण्यात यावी. शक्य असल्यास त्यांना प्रशिक्षित करण्यात यावे, नागरिकांना हलविण्यासाठी शिक्षण विभागाने शाळा तयार ठेवाव्यात, बाथरूम, शौचालय, वीज, पाणी व्यवस्था, निवास व्यवस्था सज्ज ठेवाव्या. पावसामुळे क्षतीग्रस्त होऊ शकणाऱ्या जीर्ण इमारतीची यादी तयार करून पाडण्याची गरज असल्यास तातडीने कारवाई करण्यात यावी, पावसाळ्याच्या दिवसात अग्निशमन, स्वच्छता विभागाने राखीव मनुष्यबळ नियुक्त करून रात्रीच्यावेळी देखील अलर्ट राहण्याच्या सूचना अतिरिक्त आयुक्तांनी दिल्या आहेत.










Post a Comment

0 Comments