विधानसभा अध्यक्षपद: 'या' प्रस्तावाला भास्कर जाधवांचा विरोध
विधानसभा अध्यक्षपदासाठी नाव चर्चेत आल्यानंतर शिवसेना नेते भास्कर जाधव यांनी पक्षाकडे एक विनंती केली आहे.
रत्नागिरी : तालिका अध्यक्ष म्हणून पावसाळी अधिवेशन गाजवल्यानंतर शिवसेनेचे नेते भास्कर जाधव (Shivsena Bhaskar Jadhav) यांचं नाव विधानसभा अध्यक्षपदासाठी चर्चेत आलं आहे. भास्कर जाधव यांच्या रुपाने शिवसेनेकडे विधानसभेचे अध्यक्षपद द्यावं आणि त्याबदल्यात शिवसेनेकडून एखादं मंत्रिपद काँग्रेसला मिळावं, असा प्रस्ताव मांडला जाण्याची शक्यता आहे. मात्र भास्कर जाधव यांनी या संभाव्य प्रस्तावाला विरोध केला आहे. ते रत्नागिरी इथं माध्यमांसोबत बोलत होते.
'विधानसभा अध्यक्षपदाची जबाबदारी मला देण्याबाबत तीनही पक्षाचे एकमते झाले असले तरी मी ठामपणे सांगतो की, शिवसेनेने आपल्या कोट्यातील वनमंत्री पद देऊन त्याबदल्यात विधानसभेचं अध्यक्षपद घेऊ नये. या मताशी मी ठाम आहे. सेनेकडे वन खाते तसेच राहून जर सर्वांनी मिळून जर विधानसभा अध्यक्षपद दिलं तरंच ते स्वीकारावे,' अशी भूमिका भा्स्कर जाधव यांनी पक्षाकडे मांडली आहे.
0 Comments