मुंबई सारखीच चंद्रपूर झाले तुंब : 2 दिवसाच्या संततधार पावसाने चंद्रपुरातील सर्व रस्ते झाले जलमय

 

मुंबई सारखीच चंद्रपूर झाले तुंब : 2 दिवसाच्या संततधार पावसाने चंद्रपुरातील सर्व रस्ते झाले जलमय

चंद्रपूर ( राज्य रिपोर्टर ) : जिल्ह्यात दमदार पाऊस सुरू झाला असुन भात उत्पादक चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकरी सुखावत असतानाच जिल्हा मुख्यालय असलेल्या चंद्रपूरची तुंबई झाल्याचे चित्र सर्वत्र दिसत आहे. आपण नेहमीच मुंबईची पावसामुळे झालेली दैन्यावस्था बघत असतो, मुंबईच्या तुंबई ची चर्चा सर्वत्र होते मात्र चंद्रपूर मधेही जवळपास अशीच स्थिती निर्माण होत असल्याचे चित्र आहे.

दोन दिवसांच्या संततधार पावसाने चंद्रपूर महापालिकेचे अक्षरशः वाभाडे काढल्याचा अनुभव चंद्रपूरकर घेत असुन शहरातील जवळपास सर्वच मुख्य मार्गांवर पाणी साचले असुन पादचारी तसेच वाहनांना पाण्यातून मार्ग काढणे कठीण होत आहे. बर्‍याच ठिकाणी दुचाकीस्वार आपले संतुलन बिघडल्यामुळे पडण्याच्या घटनाही समोर येत आहेत.

लॉक डाऊन च्या काळात चंद्रपूर मधिल मुख्य मार्गांचे विस्तारीकरण करण्यात आले सांडपाणी वाहुन नेण्यासाठी बांधण्यात आलेल्या नाल्यांची सुद्धा डागडुजी व प्रसंगी निर्मिती करण्यात आली मात्र 2 दिवसांच्या पावसाने महापालिकेचे वाभाडे काढले असुन शहरात झालेले विकासकामे दर्जाहीन तसेच दूरदृष्टीचा अभाव असल्याचे सिद्ध होत आहे. 

महापालिकेकडे अभियंत्यांची फौज आहे हे अभियंते पगार घेण्यापुरते आहेत की ह्यांना काम सुद्धा करायचे असते ह्याची जाणीव करून देणे गरजेचे झाले आहे. अनुभवी अभियंते असूनसुद्धा दरवर्षी शहरातील मुख्य मार्गांवर तलाव कसे निर्माण होतात ह्याचे उत्तर अभियंत्यांनी जनतेला देणे अनिवार्य असुन हे स्थापत्य अभियंते केवळ इमारतींचे बांधकाम परवाने देणे तसेच अवैध इमारतींना संरक्षण देणे ह्यासाठी नियुक्त झाले आहेत की जनतेच्या सोईसुविधा निर्माण करणे हे त्यांचे कर्तव्य आहे ह्याची जाणिव संबंधित विभागाला करून देणे अत्यावश्यक ठरत आहे. दरवर्षी पावसाळ्याच्या आधी लाखो रुपये खर्च करून नाले सफाई करण्यात येते तरीही पावसाचे पाणी रस्त्यांवर कसे काय साचते ह्याचा शोध घेण्याचे गांभीर्य सत्ताधारी तसेच विरोधी अशा दोन्ही पक्षात नाही हे चिंतनीय आहे. जनतेच्या लाखो रुपयांचा निधी खर्च केल्यानंतरही जर सांडपाणी वाहुन नेणाऱ्या नाल्या तुंबत असतिल तर संबंधित ठेकेदार तसेच कामाला योग्य ठरवून पूर्णत्वाचे प्रमाणपत्र बहाल करणार्‍या अभियंता अथवा अधिकाऱ्याला दोषी धरून खर्च केलेली संपुर्ण रक्कम संबंधितांकडुन वसुल का केली जात नाही हा यक्षप्रश्न आहे. महापालिकेच्या सत्ताधारी पक्षाचे दोन्ही हेवीवेट नेते वास्तव्यास असलेल्या गिरनार चौक पटेल हायस्कूल परिसरात रस्त्यावर तलाव निर्माण झाल्याचे चित्र असुन माजी गृहराज्यमंत्री हंसराज अहिर ह्यांच्या घरापासून हाकेच्या तर माजी वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार ह्यांच्या घरापासून काही पावलांवर असलेल्या भागात दिसणारे हे चित्र महापालिकेच्या बेफिकीरपणाची साक्ष देत आहे. महापालिका प्रशासन ह्या गंभीर प्रश्नावर खरेच गंभीर होउन कारवाई करणार की पुन्हा गेंड्याची कातडी पांघरुन ढाराढूर झोपणार ह्याकडे चंद्रपूरवासीयांचे लक्ष लागले आहे हे मात्र खरे.




Post a Comment

0 Comments